कांजूरमार्ग पूर्व येथील पूर्वीच्या जॉली बोर्ड नाल्यावरील पुलाचे तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग व जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील पाईप ड्रेनचे पाडकाम करून त्याठिकाणी बॉक्स ड्रेन घेऊन नवीन पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे लवकरच या पुलाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रस्ताव पूल विभागाला सादर
या भागातील नाल्यामधून ९०० मी.मी. व्यासाची पाईपलाईन गेलेली आहे. त्या पाईप लाईनचा पाण्याचा प्रवाहात अडथळा निर्माण होत असल्याचे पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या विभागाने पूल विभागाला याची कल्पना दिली. त्यामुळे स्थानिक शिवसेना नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी याठिकाणी नाल्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी रुंदीकरणासाठी पुलाचे बांधकाम करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पूर्वीचा पूल ६ मीटर पेक्षा मोठा असल्याने पर्जन्य जलवाहिनी विभागाने हा प्रस्ताव पूल विभागाला सादर केला. त्यानुसार पूल विभागाने जॉली बोर्ड नाल्यावरील पुलाच्या पुनर्बांधणीचे काम आणि ९०० मी.मी. पाण्याच्या पाईप लाईनची उंची नवीन बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या स्लॅबपर्यंत घेण्यात निश्चित करण्यात आले.
(हेही वाचा हिंदू देवतांची विटंबना करणारे हास्यकलाकार वीर दास, मुनव्वर फारूकीचे कार्यक्रम रद्द!)
११ कोटी रुपये खर्च करणार
यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये टेन कंस्ट्रक्शन कंपनी ही पात्र ठरली असून यामध्ये सुमारे ११ कोटी रुपये खर्च करून पुलाची पुनर्बांधणी करून पाईप ड्रेनचे पाडकाम करून बॉक्स ड्रेनचे काम केले जात आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका सुवर्णा कारंजे यांनी या कामांमुळे भांडुप पश्चिम भागासह कांजूरमार्ग पूर्व भागांमधील तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्या मिटणार आहे. या पुलाची पडझड २०००मध्ये झाली होती. त्यामुळे या पुलाचे बांधकाम केले जाणार असून नाल्यातील प्रवाहालाही गती मिळणार असल्याने तुंबणाऱ्या पाण्याची समस्या निकालात निघणार आहे.
Join Our WhatsApp Community