आता मुंबईतील मैदानांत पुन्हा भरणार ‘बाजार’!

मैदानांचा वापर होणार नसल्याने अखेर याठिकाणी फेरीवाल्यांसाठी जागा आरक्षित करुन तात्पुरत्या स्वरुपात बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

मुंबईत एप्रिलच्या पहिल्याा आठवड्यापासून निर्बंध लागू करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात २१ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे आता लोकांची रस्त्यावरील गर्दी कमी करताना त्यांना सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाल्यासह इतर वस्तूंची खरेदी करता यावी, यासाठी आता मैदानांमध्ये पुन्हा एकदा भाजी विक्रेत्यांना जागा आखून दिली जात आहे. यापूर्वी मैदाने पूर्णपणे बंद करण्याचे कोणतेही निर्देश नसल्याने, सर्व सहाय्यक आयुक्तांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. पण १५ एप्रिलपासून मुंबईसह राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने, मैदानाच्या मोकळ्या जागांमध्ये भाजी विक्रेत्यांना जागा करुन दिली जात आहे.

तात्पुरत्या स्वरुपात मैदानात जागा

मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर, सुरक्षेचा उपाय म्हणून मैदानांच्या जागांवर ठराविक अंतरावर फेरीवाल्यांना तसेच भाजी विक्रेत्यांना बसण्याची व्यवस्था केली होती. पण हा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आला आणि त्यानंतर खेळाची मैदाने पुन्हा एकदा मुलांना खेळण्यास खुली झाली होती. पण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह राज्यात कडक निर्बंध लागू करुन, आठवड्यातील दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे मुंबईतील रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी, भाजीपाला विक्रेते तसेच अन्य फेरीवाल्यांना मैदानातील मोकळ्या जागांवर बसण्याची व्यवस्था करताना अडचणी येत होत्या. मैदाने ही पूर्णपणे बंद नसल्याने प्रत्येक विभागाच्या सहाय्यक आयुक्तांपुढे हा पेच होता. पण १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केल्यांनतर, या मैदानांचा वापर होणार नसल्याने अखेर याठिकाणी फेरीवाल्यांसाठी जागा आरक्षित करुन तात्पुरत्या स्वरुपात बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

(हेही वाचाः लसीकरण केंद्र उभारणीत शिवसेना -भाजप नगरसेवकच आघाडीवर!)

गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू

घाटकोपरमधील मैदानांमध्ये अशाप्रकारे फेरीवाल्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी गर्दीचे प्रमाण कमी करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात फेरीवाल्यांना बसण्याची व्यवस्था केली आहे. तसेच आता अन्य विभागांमध्ये सहाय्यक आयुक्तांकडून अशाप्रकारे मैदानांमध्ये फेरीवाल्यांना तात्पुरत्या स्वरुपात बसून रस्त्यांवरील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here