मलबार हिलमधील ‘या’ कामांना अतिरिक्त २० कोटींची मजबुती

101

मलबार हिलमधील एन.एस.पाटकर मार्गाचे काँक्रिटीकरण करणे आणि येथील टेकडीवरील भाग खचल्याने तेथील संरक्षक भिंत बांधण्याच्या कामांमध्ये २० कोटी रुपयांनी वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. या रस्त्यांचे सिमेंटीकरण तसेच टेकडीवरील संरक्षक भिंत बांधण्यासाठी ४० कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. परंतु आता त्यामध्ये वाढ होऊन होऊन हे कंत्राट काम ६० कोटींच्या घरात जाऊन पोहोचले आहे.

इतका होता निर्धारित खर्च

दक्षिण मुंबईतील एन.एस. पाटकर मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि मलबार हिलच्या टेकडीवरील खचलेल्या भागी संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला ३० डिसेंबर २०२० रोजी मंजुरी दिली होती. या कामासाठी देव इंजिनिअर्सची निवड करण्यात आली असून, यावर ४० कोटी ३ लाख रुपये खर्च केला जाणार होता.

(हेही वाचाः महापालिका शाळेत भगवत गीता पठण : समाजवादी पक्षाने ‘असे’ उचलले पाऊल)

बांधकामासाठी समितीचे गठन

५ ऑगस्ट २०२० रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामध्ये हँगिंग गार्डनलगत असलेल्या एन.एस. पाटकर मार्गावरील भिंत कोसळली, तसेच बी.जी.खेर मार्ग व एन.एस.पाटकर मधील भाग खचला. त्यावेळी काही झाडे मुळासकट उन्मळून पडली. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होऊन रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. तसेच बी.जी.लगत असलेल्या पारशी पंचायतमधील इमारती व रस्त्यांचीही दुरावस्था झाली हाती. खचलेल्या जागेचे पुनर्बांधकाम करण्यासाठी आणि खचलेल्या रस्त्यांचे बांधकाम यासाठी आयआयटीचे तज्ज्ञ, महापालिकेचे अधिकारी व सल्लागार आदी आठ जणांची समिती गठीत करण्यात आली होती.

या कामांची शिफारस

या समितीच्या शिफारशीनुसार पाटकर मार्गानजिक खचलेल्या रस्त्यालगत असलेल्या मातीत नेलिंग पध्दतीने उतार बनवणे, कोसळलेल्या संरक्षक भिंतीचे पुनर्बांधकाम करणे, पाटकर मार्गावर पर्जन्य जलवाहिनीचे काम करून या मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, तसेच केम्पस कॉर्नर आणि आय.आय.टी चौकाचे मास्टिकमध्ये डांबरीकरण करण्याचे काम यामध्ये हाती घेण्यात आले.

(हेही वाचाः धारावीतील ‘के’ कंपनीचा उदय होण्यापूर्वी झाला अस्त!)

कामांमध्ये वाढ

या कामांसोबत आता पाटकर रोड लगत संरक्षक भिंतीचे सौंदर्यीकरण, अतिरिक्त सॉईल नेलिंग अर्थात सिमेंट काँक्रिटचा उतारमार्ग आदी अतिरिक्त कामे हाती घेण्यात आली आहेत. परंतु या उतार मार्गाच्या कामांमध्ये पोकळपणा असल्याने ते मजबूत बनवण्याचे काम तांत्रिक समितीने सुचवल्याने या मूळ कंत्राट कामांमध्ये वाढ झाली आहे.

रस्ते विभाग अधिका-यांची माहिती

टेकडीवरील बी.जी.खेर मार्गावर जमीन खचल्याने मोठे तडे गेले होते. तसेच त्यानंतर १७ मे २०२१मध्ये मुंबईत झालेल्या पावसामुळे खेर मार्गावर पोकळी निर्माण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तांत्रिक सल्लागार समितीने या भागाचे सिमेंट ग्राऊंडींग पध्दतीने मजबुतीकरण करण्याचे सूचवले. याशिवाय खारेघाट कॉलनीलगत असलेल्या संरक्षक भिंतीच्या काही भागांचे गॅबियन वॉल पध्दतीने मजबूतीकरण करण्यात आले आहे. याशिवाय संरक्षक भिंतीचे सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने भिंतीला बेसाल्ट दगडाच्या लाद्या अर्थात फसाड लावण्यात येण्याची शिफारस समितीने केल्याने त्याप्रमाणे अतिरिक्त काम प्रस्तावित केल्याची माहिती रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

(हेही वाचाः वरळी डेअरीच्या जागेवर मरीन अ‍ॅक्वारियमचे आरक्षण : दुग्धशाळेचा जागेवरील अधिकार संपुष्टात)

कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा प्रयत्न

त्यामुळे कामांमध्ये वाढ झाल्याने त्यांना आता कालावधीही वाढवून देण्यात येत असल्याचे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे. त्यामुळे या कंत्राटदाराला मंजूर केलेल्या ४० कोटी रुपयांच्या तुलनेत कंत्राटाची किंमत २० कोटींनी वाढून ६० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे हे कंत्राट ५० टक्क्यांनी वाढले असून कंत्राटदाराला अतिरिक्त कामे देत प्रशासनाकडून एकप्रकारे त्यांचे खिसे भरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.