मुंबईचे सौंदर्य बिघडवणाऱ्या अनधिकृत फलक आणि पोस्टर्सवर कठोर कारवाई

मुंबईला सुशोभित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने सौंदर्यीकरणाचे प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंबईच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे मुंबईचे सौंदर्य खुलवतानाच याठिकाणी लावण्यात येणारे अनधिकृत फलक आणि पोस्टर्समुळे मुंबईच्या सौंदर्याला बाधा येत आहे. त्यामुळे यासर्व अनधिकृत फलक आणि पोस्टर्सवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

( हेही वाचा : मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवस विशेष पॉवर ब्लॉक! लोकल गाड्यांवर होणार परिणाम )

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबईतील ठिकाणी नागरी सेवा-सुविधा, पायाभूत सुविधा इत्यादींच्या संबंधित कामांसह सुशोभिकरण कामे सुरु आहेत. याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात एका विशेष बैठकीचे आयोजन महानगरपालिका मुख्यालयात करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्यासह सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त संजोग कबरे यांच्यासह सह आयुक्त तथा उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रस्त्यांची सातत्याने अधिकाधिक प्रभावी साफसफाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मुंबईतील ज्या ५०० ठिकाणी सुशोभीकरणाची कामे नियोजित आहेत व प्रगतिपथावर आहेत, त्या सर्व ठिकाणी पथदिवे व प्रकाशयोजना अधिक प्रभावी करण्याचेही निर्देश दिले आहेत.

महानगरपालिका अखत्यारितील पुलांची अधिक प्रभावी साफसफाई करण्यासह तेथे आकर्षक रंगरंगोटी करण्यासह याच पद्धतीने वाहतूक बेटांचेही सुशोभीकरण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. येत्या २६ जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध ठिकाणी सुशोभीकरण कार्यवाही करण्याचेही निर्देश दिले आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत सध्या विविध ५२ ठिकाणी दवाखाने मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत आहेत. ही संख्या येत्या २६ जानेवारीपर्यंत आणखी ५० ने वाढवून १०२ करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागामध्ये सलग २४ तास कार्यरत असणारे शौचालय कार्यान्वित करण्याचे निर्देश दिलेत. शिवाय शौचालयांची नियमितपणे व योग्यप्रकारे साफसफाई करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. अति धोकादायक वर्गवारीत समाविष्ट झालेल्या अगर होणा-या शौचालयांचे पुनर्बांधकाम करण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

प्रत्येक विभागातील किमान एका ठिकाणी हायमास्ट दिवा बसविण्याचे निर्देश. या प्रकारचा दिवा बसविताना ज्या ठिकाणी अधिक प्रकाशाची गरज आहे, अशा ठिकाणाचे निर्धारण सुयोग्यप्रकारे करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले. ज्या ठिकाणी रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाची व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याची कामे सुरु आहेत. लवकरच हाती घेतली जाणार आहेत, त्या सर्व ठिकाणांबाबत वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून कामे करण्याचे निर्देश दिले जेणेकरुन, सदर रस्त्यांवरील वाहतूक शक्य तेवढ्या सुरळीतपणे सुरु राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here