अनाथ बालकांचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता कठोर कारवाई

बालकांना परस्पर दत्तक घेणे-देणे वा खरेदी-विक्री करणे, हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.

116

कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना, बेकायदेशीररित्या दत्तक वा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाजमाध्यमांवरील पोस्ट वरुन दिसून येत आहे. समाजकंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून, असे करणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही विभागाने कळवले आहे.

पालकांच्या अचानक मृत्यूमुळे गंभीर समस्या

कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोविड-19 मुळे दोन्ही पालकांच्या मृत्यूमुळे अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. अशा बालकांचा काही वेळा आप्तस्वकीयांकडून स्वीकार न झाल्यामुळे या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे.

(हेही वाचाः लॉकडाऊनमुळे स्कूल बस व्यवसायिक तोट्यात! ७ सात जणांची आत्महत्या!)

बालकांची बेकायदेशीर खरेदी-विक्री 

एकीकडे अशा बालकांचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करत असून, काही समाजकंटक या समस्येचा वापर संधी म्हणून करुन घेत परस्पर मुलांची विक्री करत असल्याचे चित्र समाजमाध्यमांवरील पोस्टवरुन दिसून येत आहे. यासाठी फेसबूक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी समाजमाध्यमांचा वापर करुन त्यावर विविध भावनात्मक पोस्ट टाकल्या जात आहेत. हे समाजकंटक बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अशाप्रकारे बालकांना परस्पर दत्तक घेणे-देणे वा खरेदी-विक्री करणे, हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अशाप्रकारचे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, 2015 तसेच दत्तक नियमावली, 2017 नुसार, कठोर कारवाईस पात्र आहे.

महिला व बालविकास आयुक्तालयाचे आवाहन

राज्यात कुठेही कोविड-19च्या कारणाने पालक गमावल्यामुळे, अनाथ झालेली बालके आढळून आल्यास 1098 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा अथवा सारा महाराष्ट्र (स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी) च्या 8329041531 या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्तालयाने केले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बालकल्याण समिती व पोलिस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून या बालकांना ताब्यात द्यावे, त्याची शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. असे सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः मुंबईत रक्तदानात भाजपचे एक पाऊल पुढे… काँग्रेसही पाठोपाठ!)

ज्या पालकांना बालक दत्तक घ्यावयाचे आहे, अशा पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या ‘कारा’ (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी) या प्राधिकरणाच्या www.cara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याआधारे हे पालक दत्तकासाठी अर्ज नोंदणी करू शकतात, असेही महिला व बालविकास विभागाने कळवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.