सध्या राज्यात मशिदींवरील भोंग्यावरुन राजकारण पेटले आहे. 1 मेला महाराष्ट्रदिनी (रविवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणानंतर आता 4 मेपासून राज्यात राज ठाकरेंच्या भाषणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसेच, ईदच्या पार्श्वभूमीवर कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर लाऊड स्पीकर विकणा-या दुकानदारांना भोंगे विकत घेणा-या व्यक्तींच्या संपूर्ण माहितीची नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मिरवणुकांवरही बंदी
भोंगे विकत घेणा-यांची नोंद करण्यासोबतच पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळांच्या 200 मीटर अंतरावर जमावबंदी लागू करण्यात आली असून, वाद्य वाजवण्याबरोबरच मिरवणुकांवरही बंदी घालण्यात आली आहे.
भोंगे विक्रीवर करडी नजर
मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत, तर 4 मे पासून आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. तसेच, 3 मे ला ईद असल्याने, पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यासोबतच आता भोंगे विक्रीवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यासाठी लाऊड स्पीकरच्या वापरामुळे होणा-या ध्वनीप्रदुषणाचे कारण पुढे करण्यात आले आहे.
( हेही वाचा: घाटी लोकांना क्रिकेटमधले काय कळते? या एका वाक्यावरुन झाला ‘वानखेडे स्टेडिअम’चा जन्म )
लाऊड स्पीकर खरेदी करणा-यांची माहिती पोलिसांना द्यावी लागणार
पोलीस आयुक्तालय परिसरात लाऊड स्पीकरची विक्री करणा-या दुकानदारांनी, कंपन्यांनी खरेदी करणा-या व्यक्तींचे नाव व पत्ता, ओळखपत्र, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, लाईट बील यांची तपासणी करुन पोलीस ठाण्याला नोंदी देणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच, लाऊड स्पीकर खरेदी करणा-याने कोणत्या उद्देशाने खरेदी केला आहे. याबाबतची माहितीही पोलिसांना द्यावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community