बायोमेट्रीक हजेरी बंद न झाल्यास येत्या बुधवारपासून कामबंद आंदोलन

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केंद्र व राज्य सरकार यांनी बायोमेट्रीक हजेरी पध्दत बंद केलेली असताना मुंबई महापालिकेमध्ये एक अतिरिक्त आयुक्त सरकारविरोधी भूमिका कशी काय घेऊ शकतात, असा सवाल करत म्युनिसिपल मजदूर युनियनने १० जानेवारीपासून बायोमेट्रीक हजेरीची प्रणाली बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय न घेतल्यास बुधवारी, १२ जानेवारीपासून महापालिकेतील सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्यास स्थगिती देण्याबाबतचे परिपत्रक जारी केले

मुंबईत कोरोनाचे बाधित रुग्ण वाढत असल्याने तुर्तास या बायोमेट्रीक हजेरी प्रणालीला स्थगिती देण्याची मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनसह अन्य कामगार संघटनांकडून होत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्यास स्थगिती देण्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शासनाच्या धर्तीवर तथा निर्देशानुसार बायोमेट्रीक हजेरीला स्थगिती देण्याबाबतचे परिपत्रक काढणे अपेक्षित होते. त्यानुसार हे परिपत्रक काढण्याची कार्यवाही झाल्यानंतरही यावर अंतिम स्वाक्षरी केली जात नाही. त्यामुळे कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे याबाबत म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी महापालिका प्रशासनाला आपल्या कर्मचाऱ्यांची पर्वा नसल्याचा आरोप केला आहे.

(हेही वाचा मुंबईतील रुग्ण संख्या २० हजारांवर स्थिरावली)

इक्बालसिंह चहल यांनी स्वाक्षरी केली नाही

३ जानेवारी २०२२ रोजी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बायोमेट्रीक हजेरीच्या स्थगितीबाबत अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांच्या दालनात चर्चा करून त्यानुसार परिपत्रकाचा मसुदा तयार करण्यात आल्यानंतरही त्यावर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्वाक्षरी केली नाही. एका अतिरिक्त आयुक्तांनी बायोमेट्रीक हजेरी सुरुच रहावी, अशी भूमिका घेतल्यामुळेच आयुक्तांनी बायामेट्रीक हजेरी स्थगिती करण्याच्या परिपत्रकावर स्वाक्षरी केली नसल्याचा आरोप युनियनचे कार्याध्यक्ष अशोक पवार आणि वामन कविस्कर यांनी केला आहे. ज्या बायोमेट्रीक हजेरी मशिन्स आहेत, त्यातील ७५ टक्के मशीन्स कामच करत नाही. त्यामुळे प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये ७५ ते ८० टक्के मशिन्स बंद आहेत, याची खात्री न करता महापालिका प्रशासन कोणत्या आधारावर बायोमेट्रीक हजेरी चालू करा, असे म्हणत आहे, याचा खुलासा व्हायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे. बायोमेट्रीक मशिन सदोष असल्यामुळे ४५ लाख एएनएम अर्थात अटेन्डन्ट नॉन मेन्टेन झाले आहे. त्यामुळे कामगारांचे हजारो रुपये कापले गेले आहे,असेही जाधव यांनी नमुद केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here