बाह्ययंत्रणेद्वारे Mechanized Cleaning Services ला कर्मचारी संघटनेचा तीव्र विरोध

२९ जानेवारीपासून तीव्र आंदोलनाचा इशारा

37
बाह्ययंत्रणेद्वारे Mechanized Cleaning Services ला कर्मचारी संघटनेचा तीव्र विरोध
  • प्रतिनिधी

राज्यातील वैद्यकीय, आयुर्वेद, दंत व होमिओपॅथी महाविद्यालये तसेच रुग्णालयांमध्ये बाह्ययंत्रणेद्वारे मेकॅनाईझड क्लिनिंग सेवांचा (Mechanized Cleaning Services) प्रस्ताव राज्य शासनाने आणल्यावर मुंबई जिल्हा चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेने तीव्र विरोध व्यक्त केला आहे. दि. २९ जानेवारीपासून सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील वर्ग-४ कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शासन निर्णयावर आक्षेप

राज्य शासनाने दि. १२ जुलै, २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार रुग्णालयांमध्ये बाह्ययंत्रणेद्वारे मेकॅनाईझड क्लिनिंग सेवा (Mechanized Cleaning Services) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, मुंबईतील जे. जे., सेंट जॉर्ज, कामा व आल्ब्लेस, जी. टी., पोद्दार आयुर्वेद रुग्णालय अशा महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये मंजूर जागांवरील सर्व सफाई कर्मचारी आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत.

सर्व रुग्णालयांमध्ये आंतरकक्ष, व्हरांडे, शौचालये, स्नानगृहे यांची स्वच्छता नियमितपणे केली जाते. मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेसाठी विविध पुरस्कार देऊन या रुग्णालयांची प्रशंसा केली आहे. त्यामुळे, मेकॅनाईझड क्लिनिंग सेवेची (Mechanized Cleaning Services) आवश्यकता नाही, असा दावा संघटनेने केला आहे. संघटनेच्या मते, बाह्ययंत्रणेद्वारे स्वच्छता करण्याचा निर्णय आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असून, सरकारी तिजोरीवर अनावश्यक भार पडणार आहे.

(हेही वाचा – Netaji Subhash Chandra Bose यांच्याविषयीची गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करण्याची उच्च न्यायालयात मागणी)

जून २०२४ च्या घटनेचा दाखला

संघटनेने जून २०२४ मधील एका घटनेचा संदर्भ दिला, ज्यामध्ये जे. जे. रुग्णालयातील एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला परिचारिकेने मारहाण केल्याच्या प्रकरणावरून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. त्या आंदोलनादरम्यान कपात केलेले वेतन परत देण्याची मागणी अजूनही प्रलंबित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

आंदोलनाची तयारी

संघटनेने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आयुक्तांना दि. २१ जानेवारी रोजी पत्र लिहून मेकॅनाईझड क्लिनिंग सेवांचा (Mechanized Cleaning Services) निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास दि. २९ जानेवारीपासून मुंबईतील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील वर्ग-४ कर्मचारी तीव्र आंदोलन पुकारतील, असा इशारा सरचिटणीस पराग आडिवरेकर यांनी दिला आहे.

या आंदोलनामुळे रुग्णालयांतील सेवा ठप्प होण्याची शक्यता असून, यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.