अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पुल अतिधोकादायक असल्याचे जाहीर केल्यानंतर मागील सोमवारपासून हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्थानिक आमदार व महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. या पाहणीमध्ये या पुलाचे पुन्हा एकद स्ट्रक्चरल ऑडीट करून अभिप्राय घेण्यात यावे. ज्यामध्ये या पुलाचे पाडकाम होईपर्यंत रिक्षा आणि दुचाकी वाहनांसाठी वापर करण्यास योग्य आहे का हे पडताळून पाहावे. जर या ऑडीट अहवालामध्ये या तीन चाकी व दुचाकी वाहनांची वाहतूक सुरु ठेवता येईल अशाप्रकारचा अभिप्राय आल्यास या पुलाचे पाडकाम होईपर्यंत ही वाहतूक सुरु ठेवली जावी, अशाप्रकारच्या सुचना पालकमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.
अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे रेल्वे हद्दीतील बांधकाम कोणी तोडावे याबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालेला आहे. रेल्वे हद्दीतील पुलाचे बांधकाम महापालिकेच्या माध्यमातून तोडले जाणार असल्याने या पाडकामासह पुलाचे पुनर्बांधणीच्या कामांसाठी यासाठी निविदा मागवली. परंतु आता हे बांधकाम तोडण्याची जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाकडे सोपवल्याने आता महापालिकेनेही काढलेल्या निविदेमध्ये सुधारणा करत केवळ पाडकाम वगळून बांधकाम करण्यासाठीच निविदा आमंत्रित केल्या आहेत.
अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पूल अतिधोकादायक असल्याचे जाहीर केल्यानंतर या पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी मागील सोमवारपासून हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम रेल्वे आणि महापालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या हद्दीमध्ये महापालिकेच्यावतीने बांधकाम केले जाणार आहे. तसेच कर्णाक पुलाचे बांधकाम रेल्वेच्या हद्दीमध्ये रेल्वे प्रशासन करत आहे. परंतु त्याचवेळी गोखले पुलाचे रेल्वे हद्दीतील पाडकाम व बांधकाम हे महापालिकेच्यावतीने करण्यात यावे अशाप्रकारची सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेने पाडकामासह पुनर्बांधणीसाठी निविदा मागवली होती.
परंतु केंद्रीय मंत्र्यांसमवेत उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, महापालिका अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू, रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच विभागीय व्यवस्थापक, महापालिकेच्या पूल विभाग आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये रेल्वेच्या हद्दीतील बांधकामाचे पाडकाम हे रेल्वेच्यावतीनेच केले जावेत अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर रेल्वे हद्दीतील पाडकाम हे रेल्वे प्रशासन करणार असल्याने महापालिका पूल विभागाने निविदा अटींमध्ये सुधारणा करत केवळ बांधकामासाठी या निविदा निमंत्रित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
मात्र, असे असले तरी महापालिकेने याच पार्श्वभूमीवर आय आय टी पवई या संस्थेची याच कामांसाठी केली आहे. यासाठी आयआयटी पवई या संस्थेला १९ लाख रुपयांचे सल्लागार शुल्क अदा केले आहे. त्यामुळे जिथे महापालिका केवळ रेल्वे हद्दीतील पुलाचे बांधकाम करणार असले तरी सल्लागार नेमलेल्या आयआयटी पवईला पाडकामासह बांधकामासाठी पैसे अदा केले आहे. परंतु महापालिका पुलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पुलाच्या बांधकामाचे आरखडे हे आयआयटीच्या देखरेखीखाली बनवले जाणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, गोखले पुलाच्या घटनास्थळी उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, आमदार पराग अळवणी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू, उपायुक्त उल्हास महाले तसेच पूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या पाहणीमध्ये या पुलाचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडीट करून हलक्या वाहनांना प्रवेश देता येईल का याबाबतचे अभिप्राय घेण्यात यावेत अशाप्रकारची सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. यासाठी पुढील आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करण्यात यावा अशाप्रकारच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्याचे आमदार अमित साटम यांनी सांगितले. या पुलाच्या पाडकामासाठी पुढील आठवड्यात निविदा काढली जाईल,असेही साटम यांनी सांगितले.