ST चा ७६ वा वर्धापन दिन प्रत्येक बसस्थानकावर उत्साहात साजरा होणार

175
ST चा ७६ वा वर्धापन दिन प्रत्येक बसस्थानकावर उत्साहात साजरा होणार

शनिवार, १ जून १९४८ ला पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली. त्या निमित्ताने दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. १ जून रोजी एसटीच्या सर्व बसस्थानकांवर प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त सर्व बसस्थानके रांगोळी काढून, फुला पानाचे तोरणे बांधून सजविण्यात येणार आहेत. (ST)

गेली ७६ वर्ष राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व किफायतशीर प्रवाशी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एसटी प्रामाणिकपणे करत आली आहे. आता देखील ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक अडी-अडचणी, अडथळे, आर्थिक संकटावर मात करत राज्याच्या डोंगरदऱ्यातील वाड्या-वस्त्यांपासून आदिवासी पाड्यापर्यंत एसटी (ST) आपली प्रवासी दळणवळण सेवा देत आहे. त्यासाठी ८७ हजार कर्मचारी व अधिकारी वृंद रात्रंदिवस राबत आहेत. केवळ ३६ बेडफोर्ड बसेवर सुरू झालेला हा प्रवास ७६ वर्षात १५ हजार बसेस पर्यंत पोहोचला आहे. या बसेसच्या माध्यमातून ५६० पेक्षा जास्त बस स्थानकांवरून दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. (ST)

(हेही वाचा – निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला; आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या…)

७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी, पत्रकार अशा ३० पेक्षा जास्त समाज घटकांना एसटीच्या प्रवाशी सेवेमध्ये ३३ टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत शासनाद्वारे सवलत दिली जाते. याबरोबरच गणेश उत्सव, दिवाळी, आषाढी, कार्तिर्की यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवाच्या निमित्ताने नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष फेऱ्या सोडून एसटी सर्व सामान्य प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची सोय करते. तसेच शालेय सहली, लग्न समारंभ, विविध शासकीय महोत्सव, मेळावे यासाठी देखील एसटी आपली सेवा पुरवीत आहे. (ST)

गेली ७६ वर्ष प्रवाशांचे प्रेम आणि विश्वासार्हता या शिदोरीवर एसटी “महाराष्ट्राची लोकवाहिनी” बनली आहे. भविष्यात देखील प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने एसटी (ST) कटिबध्द राहील! अशी ग्वाही देत, लाखो प्रवाशांना एसटीच्या वतीने मा.उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (ST)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.