इमारत किंवा इमारतीच्या भागामधील आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक योजनेमधील प्रस्थापित अग्निशमन यंत्रणा उत्तम व कार्यक्षम स्थितीत असल्याबाबत परवानाप्राप्त अभिकारणाकडून कलम ३ (३) व नियम ४ (२) नुसार सहामाही प्रमाणपत्र (नमुना ब) वर्षातून दोनदा जानेवारी व जुलै महिन्यात प्राप्त करून घेणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित रहिवासी इमारती व कार्यालयांना अग्निशमन यंत्रणा कार्यरत तथा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र (नमुना ब) मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
( हेही वाचा : आता ‘तेजस’ला जोडणार आणखी एक विस्टाडोम डबा )
मुंबई महानगरातील इमारती व आस्थापनांमध्ये अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी सातत्याने निर्देश दिले आहेत. मुंबईतील इमारती आणि आस्थापनांमध्ये अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांबाबतच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याकडे महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने लक्ष केंद्रीत केले आहे.
मुंबईतील जवळपास सर्वच भागात गगनचुंबी इमारती आहेत. आग लागून जीवित व वित्तहानी होवू नये म्हणून, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ चे कलम ३ (१) नुसार इमारतीमध्ये आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांवर भर देण्याचे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. इमारत किंवा इमारतीच्या भागामधील आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक योजनेमधील प्रस्थापित अग्निशमन यंत्रणा उत्तम व कार्यक्षम स्थितीत असल्याबाबत परवानाप्राप्त अभिकारणाकडून कलम ३ (३) व नियम ४ (२) नुसार सहामाही प्रमाणपत्र (नमुना ब) वर्षातून दोनदा जानेवारी व जुलै महिन्यात प्राप्त करून घेणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर प्रमाणपत्र इमारतीचे मालक/ भोगवटादार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर (https://portal.mcgm.gov.in) सादर (अपलोड) करण्याच्यादेखील सूचना करण्यात आल्या आहेत.
असे अपलोड करा प्रमाणपत्र
मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर (https://portal.mcgm.gov.in) मुखपृष्ठावरील (होम पेज) ‘व्यवसायाकरिता’ या रकान्यात ‘परवानग्यांकरिता अर्ज’ येथे जावून त्यात ‘अग्निशमन दस्तऐवज’ या रकान्यात हे प्रमाणपत्र अपलोड करा. ज्या इमारती किवा कार्यालय/कारखाना आदी आस्थापना प्रमाणपत्र सादर करणार नाही, त्यांच्या संबधित मालक/भोगवटादार यांच्यावर कारवाई केली जाईल असे प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी अग्निशमन दलाच्या वतीने कळवले आहे.
इमारतींमध्ये ही तपासणी करा-
- आगीची धोक्याची सूचना देणारी व आग विझविण्याची सर्व उपकरणे
- सुयोग्य हाताळण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ
- इमारतीत बसविलेली राईझर व स्प्रिंकलर सिस्टीम
अशी टाळा दुर्घटना-
- इमारतीत अंतर्गत सजावटी करताना सहज जळणा-या वस्तू, पदार्थाचा वापर टाळा
- विद्युत सुशोभीकरण करताना इमारतीच्या अंतर्गत संरचनेत, अग्निसुरक्षा यंत्रणेत, विद्युत संरचनेत फेरफार टाळा.