राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या 500 च्या पुढे जात असताना, पुण्यात ओमायक्रोनच्या विषाणूचे नवे दोन उपप्रकार आढळून आले आहेत. हे दोन्ही उपप्रकार वेगाने पसरत असल्याने, पुण्यात आता आरोग्य विभाग चांगलेच अलर्ट झाले आहे. यात एक नऊ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे.
मे महिन्यातच पुण्यात ओमायक्रोनच्या बी.ए. ४ व्हेरीयंटचे ४ तर बी.ए. ५ व्हेरीयंटचे ३ रुग्ण आढळून आले. 4 ते 18 मे दरम्यान या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. पुण्यातील बी. जे. मेडिकल महाविद्यालयात 7 रुग्णांच्या जनुकीय अहवालात बी.ए. ४ आणि बी.ए. ५ व्हेरीयंटची खातरजमा झाली. या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आल्याने, त्यांना घरीच विलगीकरणात ठेवले गेले. सर्व रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
- यात 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.
- यातील ४ जण ५० वर्षांवरील आहेत तर २ जण २० ते ४० वयोगटातील आहेत तर एकजण १० वर्षांखालील आहे.
- यातील ९ वर्षांचा मुलगा वगळता सर्वांनी कोविड लसीकरणाचे दोनही डोस घेतलेले आहेत, तर एकाने बूस्टरदेखील घेतला आहे.
- यातील दोन रुग्णांनी प्रत्येकी दक्षिण आफ्रिका आणि बेल्जीअमचा प्रवास केला आहे. ३ जणाांनी भारतात केरळ आणि कर्नाटक राज्यात प्रवास केला आहे, तर दोन रुग्णाांनी कुठेही प्रवास केलेला नाही.