गोरेगावमधील आरे कॉलनीतील पर्यायी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत असून या भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी तब्बल ६०० मि.मी व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार आहे. मात्र, या रस्त्याचा विकास करताना वन्य विभागाने घातलेल्या अटींनुसार या रस्त्यांच्या खालून प्राण्यांना येण्या-जाण्यासाठी भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. जेणेकरून या भुयारी मार्गातून वन्य प्राण्यांना जाता येईल आणि रस्त्यांवरुन नागरिकांना सुरक्षित प्रवास करता येईल अशाप्रकारे या रस्त्यांचा विकास केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा : उपनगर गलिच्छ आणि शहर स्वच्छ ? : केवळ अर्ध्या मुंबईत राबवली जाणार स्वच्छता मोहिम )
आरे कॉलनीतील मुख्य रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून केली जात असून पर्यायी वाहतूक रस्ता म्हणून वाहतूक पोलीस विभागाच्यावतीनेही या रस्त्याच्या विकासाबाबत विनंती करण्यात येत होती. सध्या आरे कॉलनीतील अंतर्गत रस्ते हे वाहतुकीसाठी योग्य नसून अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. हे रस्ते राज्य शासनाच्या आरेच्या मालकीचे आहेत. परंतु आरेच्या माध्यमातून या रस्त्यांचा विकास आजतागायत केला नाही. उलट आपल्याकडे रस्ते विकासासाठी निधीच नसल्याचे सांगत आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हातच वर करत महापालिकेनेच या रस्त्याचा विकास करावा अशी विनंती केली होती.
त्यानुसार मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आरे कॉलनीतील पर्यायी रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या रस्त्यांचा विकास करताना त्याठिकाणी जलअभियंता विभागाच्या माध्यमातून सुमारे सव्वा किलो मीटर लांबीची आणि ६०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे जलवाहिनी टाकण्यासह रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम एकाच कंत्राटदाराकडून करून घेण्यात येणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनसुार आरे कॉलनीतील हा मुख्य रस्ता आरक्षित वन क्षेत्राचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणांहून वन्य प्राण्यांची ये-जा सुरु असते. त्यामुळे वन विभागाने वन्य जीवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच त्यांनाही सुरक्षित वावर करता यावा म्हणून अंडरपास तथा भुयारी मार्ग बांधण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार रस्त्यांचा आराखडा बनवून त्यानुसार वन्य जीवांसाठी रस्त्यांच्या खालून भुयारी मार्ग बनवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
या रस्त्यांच्या विकासासह जलवाहिनी टाकण्याच्या कामांसाठी विविध करांसह एकूण २६.७० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या कामांसाठी एम.ई. इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा २१ टक्के कमी दराने हे काम मिळवले असून आरे कॉलनीत येणाऱ्या या कामांमध्ये शहरातील इतर प्रकारच्या अडचणी येणार नसले तरी वन्य जीवांचा धोका पत्करुन या रस्त्यांचा विकास आणि कामे करायची असताना एवढ्या कमी दरात लावलेल्या बोलीबाबत शंका उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community