मजूर टंचाईने त्रस्त झालेल्या भंडाऱ्यातील शेतकऱ्याने भन्नाट आयडिया करून ड्रोनद्वारे शेतात कीटकनाशक फवारणीचा यशस्वी प्रयोग केला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे विनायक बुरडे नामक शेतकऱ्याने आपल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. या प्रयोगादरम्यान परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
ड्रोनद्वारे फवारणी
भंडारा जिल्ह्यात भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात रोजगार हमीची कामे सुरु असल्याने शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी ड्रोनने फवारणी करण्याचा प्रयोग जेवनाळा येथील प्रगतशील शेतकरी विनायक बुरडे यांच्या शेतात केला आहे. शेतकरी विनायक बुरडे यांच्या शेतात किसान ड्रोन, माऊली ग्रीन आर्मी, महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती आणि आयोटेक वर्ल्ड एरिगेशनच्यावतीने हा प्रयोग यशस्वीरित्या सादर करण्यात आला. यावेळी टोमॅटो, मिर्ची आणि वांग्याच्या शेतीवर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली. विशेष म्हणजे ड्रोनच्या मदतीने एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य असून एकाच ठिकाणी उभे राहून पाच एकरांची फवारणी रिमोटच्या मदतीने ड्रोनद्वारे करता येत आहे. 30 मीटरपर्यंत उंच जाऊ शकणाऱ्या या ड्रोनमध्ये दहा लिटर कीटकनाशक साठविण्याची क्षमता असल्याने एकावेळी चार नोझलद्वारे फवारणी करता येत . त्यामुळे अगदी कमी वेळात आणि कमी मनुष्यबळात ही फवारणी होत असल्याची माहिती शेतमालकाने दिली आहे.
( हेही वाचा : आता मध्य रेल्वेचा 72 तासांचा जम्बो मेगाब्लाॅक! जाणून घ्या कोणत्या ट्रेन रद्द? )
केंद्र सरकार अर्थसहाय्य करणार
ड्रोनची किंमत पाहता शेतकऱ्यांना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन बँकेच्या अध्यक्षांनी दिले असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ड्रोनद्वारे कीटनाशक फवारणीसाठी केंद्र सरकार अर्थसहाय्य करणार असल्याचे स्पष्ट झाले असताना भंडारा जिल्ह्यात करण्यात आलेला प्रयोग हा उल्लेखनीय आहे.
Join Our WhatsApp Community