Cooper Hospital : कुपर रुग्णालयात अर्धांगवायूग्रस्त दोन रुग्णांवर चार तासांच्या आत यशस्वी शस्त्रक्रिया

या दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीत आता ९० टक्क्यांपेक्षा अधिक सुधारणा झाली आहे.

190
Cooper Hospital : मेंदूत रक्तस्त्राव झालेल्या ५९ वर्षीय महिलेला महापालिकेच्या डॉक्टरांनी दिले जीवनदान 
Cooper Hospital : मेंदूत रक्तस्त्राव झालेल्या ५९ वर्षीय महिलेला महापालिकेच्या डॉक्टरांनी दिले जीवनदान 

अर्धांगवायूग्रस्त होताच तातडीने उपचारांसाठी एकापाठोपाठ दाखल झालेल्या दोन रुग्णांवर अवघ्या चार तासांच्या आत ‘मेकॅनिकल थ्रॉम्‍बेक्‍टोमी’ ही शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान देण्याची कामगिरी मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयाने करून दाखवली आहे. या दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीत आता ९० टक्क्यांपेक्षा अधिक सुधारणा झाली आहे. महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्‍णालयामध्‍ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करण्याचा भाग म्हणून, रुग्णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. शैलेष मोहिते आणि शैक्षणिक अधिष्‍ठाता, औषधवैद्यकशास्‍त्र विभागप्रमुख डॉ. नीलम रेडकर यांच्‍या प्रयत्‍नांतून मेंदू विकार उपचार (न्‍युरोलॉजी) विभाग गतवर्षी (सन २०२२) सुरु करण्‍यात आला. या विभागामध्ये दिल्या जाणाऱ्या विविध उपचार पद्धतींमध्ये अर्धांगवायू ग्रस्त रुग्णांवर होणारे उपचार देखील समाविष्ट आहेत.

अर्धांगवायू उपचार पद्धतीत सध्‍या आमूलाग्र बदल झाला आहे. अर्धांगवायूग्रस्‍त रुग्‍णांना लक्षणे सुरु झाल्‍यापासून साडे चार तासांच्‍या आत योग्‍य उपचार मिळाले तर त्‍यांच्‍या प्रकृतीमध्‍ये खूप सुधारणा दिसून येते. हे रुग्‍ण रुग्‍णालयात दाखल झाल्‍यावर त्यांचे निदान सी. टी. स्‍कॅन/एम. आर. आय. स्‍कॅन करुन शोधणे आवश्‍यक असते. अर्धांगवायूचे मूळ कारण जर मेंदूला रक्‍तपुरवठा करणाऱ्या रक्‍तवाहिनीमध्‍ये गुठळ्या हे असेल तर थ्रॉम्‍बोलिसिस (Thrombolysis) किंवा मेकॅनिकल थ्रॉम्‍बेक्‍टोमी (Mechanical Thrombectomy) या प्रगत उपचार पद्धती प्रचलित आहेत. रक्‍ताच्‍या गुठळीचे ठिकाण लक्षात घेऊन या दोन्‍हीपैकी एक उपचार पद्धत अवलंबली जाते.

मेकॅनिकल थ्रॉम्‍बेक्‍टोमी (Mechanical Thrombectomy) या उपचार पद्धतीत पायांतील रक्‍तवाहिनीमधून मेंदूच्‍या रक्‍तवाहिनेत शिरुन रक्‍तातील गुठळी काढली जाते. ही अवघड शस्त्रक्रिया एकापाठोपाठ दोन रुग्णांवर करण्याचा प्रसंग कूपर रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी बुधवारी ६ सप्टेंबर २०२३ जन्माष्टमी दिवशी अतिशय खुबीने हाताळून आपले कौशल्य सिद्ध केले. पहिल्या घटनेत, ५६ वर्षे वयाचे एक व्यक्ती, जे पेशाने रिक्षा चालक आहेत, त्यांना सकाळी अर्धांगवायूची लक्षणे दिसताच कूपर रुग्णालयात तातडीने आणून दाखल करण्यात आले. तर, दुसऱ्या घटनेत दुपारी अर्धांगवायू ग्रस्त एक ५० वर्षीय महिला रुग्ण दाखल झाली. या महिलेवर पूर्वी हृदयाच्‍या झडपांचीही शस्त्रक्रिया झालेली होती.

या दोन्‍ही रुग्‍णांना दाखल केले तेव्हा दोघांच्या शरीराचा डावा भाग अजिबात हालचाल करू शकत नव्‍हता. रुग्णालयात कार्यरत मानद मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. प्रद्युम्न ओक, त्‍यांचे सहकारी मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. मनीष साळुंखे, औषध वैद्यकशास्‍त्राचे सहायक प्राध्‍यापक डॉ. दीप रावळ या तीन डॉक्‍टरांच्‍या चमूने हे दोन्‍ही रुग्‍ण कूपर रुग्‍णालयात दाखल झाल्‍यापासून पुढच्‍या काही वेळेत आजाराचे निदान केले. त्यानंतर मेकॅनिकल थ्रॉम्‍बेक्‍टोमी उपचारासाठी लागणाऱ्या बाबींची उपलब्‍धता करुन दिली. दोन्‍ही रुग्‍णांवर डॉ. प्रद्युम्न ओक आणि डॉ. मनीष साळुंखे यांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्‍यान या दोन्‍ही रुग्‍णांना भूल देण्‍याची कार्यवाही भूलतज्ञ विभागप्रमुख डॉ. अनिता शेट्टी यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आली.

(हेही वाचा – I.N.D.I.A. Alliance : जागावाटप करताना इंडिया आघाडीला करावी लागणार तारेवरची कसरत)

सध्‍या हे दोन्‍ही रुग्‍ण औषधवैद्यकशास्‍त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय गुल्‍हाणे यांच्‍या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. दोन्‍ही रुग्‍णांच्‍या प्रकृतीमध्‍ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक सुधारणा झाली आहे. एकाच दिवशी एका पाठोपाठ दोन मेकॅनिकल थ्रॉम्‍बेक्‍टोमी (Mechanical Thrombectomy) करणे, ही वैद्यकीय दृष्ट्या प्रशंसनीय बाब मानली जात आहे. कारण, अर्धांगवायू ग्रस्‍त रुग्‍णांवर, आजाराचे अचूक निदान करून, लक्षणे ओळखून चार तासांच्या Window Period मध्‍ये प्रगत उपचार देणे, हे अतिशय उच्च दर्जाचे वैद्यकीय कौशल्य मानले जाते. महानगरपालिकेच्‍या कूपर रुग्‍णालयात असे प्रगत उपचार अत्यंत माफक दरात आणि तेही तत्काळ मिळतात, हे या दोन्ही घटनांतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. बुधवारी ६ सप्टेंबर २०२३ एकाच दिवशी ह्या दोन्ही शस्त्रक्रिया करण्याचे उद्भवलेले प्रसंग कूपर रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने अतिशय कौशल्याने हाताळले, त्याबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी रुग्णालय प्रशासनाचे कौतुक केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.