केईएम रुग्णालयातील २७ वर्षीय निवासी डॉक्टरने शिवडीच्या टीबी रुग्णालयात इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. आदिनाथ पाटील असे या निवासी डॉक्टरचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डॉ. आदिनाथ पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यात राहणारे असून त्यांचे वडील देखील डॉक्टर आहेत. मेडिसीन विभागात पहिल्या वर्षात पद्व्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉ. अदिनाथ पाटील दोनच दिवसांपूर्वी केईएममधून शिवडीच्या टीबी रुग्णालयात कार्यरत झाले होते.
(हेही वाचा Governor Appointed MLC : राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी सरकारला 21 ऑगस्टपर्यंत भूमिका मांडण्याचे निर्देश)
रविवारी रात्री टीबी रुग्णालयातील मेडिसीन विभागाच्या वार्डातील साईट रूममध्ये जाऊन डॉ. अदिनाथ यांनी हातावर इंजेक्शन घेतले व तेथेच झोपून राहिले. सोमवारी सकाळी त्यांच्या रूम पार्टनर डॉ. वेदांत यांना ते बेशुद्ध अवस्थेत मिळाल्याने त्यांनी तात्काळ के ई एम रुग्णालय येथे आणले. कर्तव्यावरील डॉ. साहिल शिंदे यांनी त्यांना तपासले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान केले.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, घटनास्थळी दाखल झालेल्या रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी डॉ. आदिनाथच्या खोलीतून इंजेक्शन सिरीज ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिसाना सुसाईड नोट मिळून आलेली नसून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून अभिमन्यूच्या कुटुंबाला कळविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community