छत्रपती संभाजीनगरात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपाच्या आमदाराचे नाव असल्याने खळबळ उडाली आहे. येथे जयदत्त सुरभेये असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपाचे आमदार नारायण कुचे यांचे नाव आहे. कुचे यांच्या धमक्यांमुळेच आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुरभेये यांनी केला आहे.
(हेही वाचा – Maharashtra Police Transfer: राज्यात पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे शहराला मिळाले तीन नवे पोलीस अधिकारी)
नेमकं प्रकरण काय ?
जयदत्त सुरभेये याने आमदार नारायण कुचे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला जातोय. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये भाजपा आमदार नारायण कुचेंच्या धमक्यांमुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जयदत्त या तरुणाने कुचे यांच्या जय भवानी बँकेकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सुसाईड नोटमध्ये नारायण कुचे यांचे नाव असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय – नारायण कुचे
आत्महत्या केलेल्या तरुणाला मी आयुष्यात कधीही बोललेलो नाही. मी त्याला प्रत्यक्षात कधीही भेटलेलो नाही. आमचा फोनद्वारेही संपर्क झालेला नाही. मृत तरुणाचा आणि माझा व्यवहाराचा कधीही संबंध आलेला नाही. मृत तरुण माझा नातेवाईकच आहे. मृत तरुणाची बहीण माझी सून आहे. मृत तरुणाचा मेहुणा माझ्या पतसंस्थेत नोकरीला आहे. त्यांचं नाव मोतीलाल कुचे आहे. त्यामुळे मृत व्यक्ती माझा जवळचा नातेवाईक आहे, असे स्पष्टीकरण नारायण कुचे यांनी दिले आहे.
सध्या चर्चेत असलेली चिठ्ठी ही दुसऱ्याच व्यक्तीने पोलिसांना दाखवलेली आहे. राजकीय द्वेषापोटी मला कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे का? असा मला संशय आला आहे. त्यामुळेच मी स्वत: सीपी साहेबांना या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केलेली आहे, असे नारायण कुचे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे
मी फोनद्वारे धमकी दिली, असा आरोप केला जात आहे. मी धमकी देणारा माणूस नाही. मृत तरुणावर लाख ते दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाचे हफ्ते क्लियर आहेत. ही चिठ्ठी मृत तरुणानेच लिहिलेली आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी नारायण कुचे यांनी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community