राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासली, त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार झाला, अशा वातावरणात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट दिल्लीवरून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणला. त्यामुळे खासदार डॉ. पाटील यांच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
अरुण कडू आणि इतर तीन जणांनी ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये याचिकाकर्त्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीवरून आणलेले आणि अहमदनगरमध्ये बेकायदेशीरपणे वितरण केले आहे. हे इंजेक्शन खरी होती की खोटी होती, याविषयी कुणालाही कल्पना नाही, त्यामुळे या सर्व प्रकरणाची न्यायालयाने गंभीरपणे दखल घेऊन याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
(हेही वाचा : राज्यात दिवसभरातील लसीकरणाची विक्रमी नोंद!)
काय म्हटले न्यायालयाने?
- डॉ. विखे पाटील यांनी आणलेल्या इंजेक्शनचा साठा ताबडतोब ताब्यात घ्यावा आणि ते गोरगरीब रुग्णांमध्ये वितरित करावीत, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. याची न्यायालयाने दखल घेऊन राज्य सरकारला योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
- रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणी गुन्हा का दाखल केला जाऊ नये, अशी विचारणा न्यायालयाने केली. 29 एप्रिलपर्यंत राज्य सरकारने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
- त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत आता 29 एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी स्पष्ट होणार आहे.
- सुजय विखे पाटील यांनी खासगी विमान करुन ३०० रेमडेसिवीर इंजेक्शन अहमदनगरला आणली.