सुकन्या समृद्धी योजनेचा सातवा वर्धापन दिन भारतीय डाक विभाग येत्या २४ जानेवारीला साजरा करीत आहे. याअंतर्गत भारतीय पोस्ट विभाग मुलींचे भविष्य उज्वल व सक्षम करण्याची संधी देत आहे. सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची एक छोटी ठेव योजना आहे. जी केवळ मुलींसाठी आहे. ही योजना ”बेटी बचाव बेटी पढाओ” चा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली आहे.
उज्ज्वल भविष्यासाठी योजना
मुलींच्या उच्च शिक्षणासाठी, तिच्या विवाहासाठी तसेच महिला सक्षमीकरण करणे या उद्देशाने भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे. मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून १० वर्षाखालील मुलींचे उज्ज्वल भविष्य साधण्यासाठी सुकन्या खाते काढल्यापासून १५ वर्षे दरमहा रक्कम भरल्यास २१ व्या वर्षी ७.६ टक्के प्रमाणे मुलीला रक्कम मिळणार आहे. दरमहा बचत १ हजार रुपये केल्यास एका वर्षात १२ हजार रुपये रक्कम जमा होईल. १५ वर्षात ही रक्कम १ लाख ८० हजार रुपये जमा होईल. मुलीच्या २१ व्या वर्षात ३ लाख ३० हजार ३७३ रुपये जमा होईल. २१ व्या वर्षात चालू व्याजावर मिळणारी एकूण रक्कम ५ लाख १० हजार ३७३ एवढी असणार आहे.
( हेही वाचा : कोरोनाची तिसरी लाट : ‘या’ जिल्ह्यातील ७ लाख जनता डेंजर झोनमध्ये )
१० वर्षाच्या आतील मुलींना योजनेचा लाभ
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ० ते १० वर्षाच्या आतील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. सुकन्या खाते किमान २५० रुपयांमध्ये उघडता येते. हे खाते काढल्यापासून १५ वर्ष पैसे भरावे लागतात. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर, मुलीचे लग्न झाल्यास सुकन्या समृद्धी हे खाते मुदतपूर्व बंद करता येते. सुकन्या खात्यामध्ये कमीत कमी वार्षिक २५० रुपये व जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. खाते काढण्यासाठी ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपालिका/महानगर पालिका यांनी जारी केलेले मुलीचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे. तरी या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिम डाक विभागचे उपविभागीय अधिकारी हिवराळे यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community