छत्रपती शिवाजी महाराज हे रामायण व महाभारतातील सद्गुणांची बेरीज; Swami Govind dev giriji Maharaj यांचे गौरवोद्गार

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

227

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती नव्हते; ते एक उच्च विभूती, असाधारण कर्तृत्वाचे महापुरुष होते. हिंदू साम्राज्याच्या निर्मितीसाठी शौर्य, चातुर्य, प्रताप, सूक्ष्म व्यवस्थापन याचा अंगीकार करत त्यांनी आदर्श राजाचा वस्तुपाठ घालून दिला. रामराज्याची संकल्पना असलेल्या रामायण आणि व्यवस्थापन कौशल्याचा महाग्रंथ असलेल्या महाभारतातील सद्गुणांची बेरीज म्हणजे छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व व चरित्र आहे, असे गौरवपूर्ण प्रतिपादन अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind dev giriji Maharaj) यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित शिववंदना महानृत्याविष्कार व परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, दैनिक लोकमतचे चेअरमन विजय दर्डा, दैनिक पुढारीचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, अभिनेता भाऊ कदम, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उद्योजक संजय मालपाणी लोकमतचे समूह संपादक विजय बावीस्कर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते.

नव्या पिढीला शिवराय प्रेमाने समजावून सांगायला हवे 

स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind dev giriji Maharaj) म्हणाले, शिवराज्याभिषेक हा हिंदुस्थानच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी हिंदू साम्राज्याच्या निर्मितीचा संकल्प करून तो सत्यात उतरविण्याचा पराक्रम त्यांनी केला. प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यानंतर शिवाजी महाराज हेच जनकल्याण राजा म्हणून सर्वपरिचित आहेत. धर्म, देवतांचे रक्षण करणारा तो राजा होता. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचे पुनरुज्जीवन होत नाही, तोवर पानाचा विडा खाणार नाही, असा संकल्प करणारे ते राजे होते. त्यामुळे शिवरायांचा प्रताप, शौर्य, व्यवस्थापन कौशल्य, राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती, संस्कृती रक्षण या गोष्टी नव्या पिढीला प्रेमाने आणि बुद्धिमतेने समजावून सांगायला हव्यात.

सर्वांना पूज्य व प्रिय असे देवर्षी नारदमुनी आद्यपत्रकार होते. त्यांच्यापासून सुरु असलेल्या या पत्रकारितेच्या परंपरेने केलेला हा सन्मान आहे. तो नारदमुनींचा प्रसाद म्हणून स्वीकार करतो. पत्रकारांच्या संस्थेकडून असा सन्मान होणे ही सुखावणारी बाब आहे. हा घटक समाजाचा आरसा असतो. समाजातील चांगल्या-वाईट गोष्टींचा उहापोह करून त्याला योग्य मार्गावर आणण्याचे काम पत्रकार करीत असतात. राष्ट्राच्या, समाजाच्या व धर्माच्या कल्याणासाठी पत्रकारांनी आपले कर्तव्य निष्ठेने बजावायला हवे, असेही स्वामी गोविंददेव गिरी (Swami Govind dev giriji Maharaj) यांनी यावेळी सांगितले.

शिवराय हिंदवी स्वराज्यासाठी जगावे कसे, हे शिकवतात – भगतसिंग कोशारी

भगतसिंग कोशारी म्हणाले, देशाचा अमृतकाल आणि स्वामीजींचे अमृत महोत्सवी वर्ष अशावेळी त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान होतोय, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचे विचार माझा आदर्श आहे. येथील संत, महापुरुष हे विश्वव्यापी विचारांचे प्रतीक आहेत. नालंदा, तक्षशिला अशा समृद्ध वारसा असलेल्या संस्था आपल्या देशात होत्या. पुन्हा एकदा आपण सुवर्णकाळाकडे जात आहोत. धर्म आणि संस्कृतीप्रधान देशात आपल्याला धर्मनिरपेक्ष म्हणवले गेले. अध्यात्म हा आपला आधार असून, विज्ञान व अध्यात्माची सांगड घालून आपण राष्ट्रहितासाठी योगदान दिले पाहिजे. अध्यात्म, सदाचाराशिवाय समाज चांगल्या मार्गाने चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्यासाठी जगावे कसे, याची शिकवण देतात. पत्रकारांनी नेहमी पाय खेचण्यापेक्षा चांगल्या विचारांच्या लोकांना पुढे आणून सन्मानित केले, तर समाजप्रबोधनाचे चांगले कार्य होईल.

चंद्रकांत पाटील म्हणाले, समाजातील रत्ने शोधून त्यांना सन्मानित करण्याचे पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद आहे. अध्यात्मिक क्षेत्रात स्वत:चे एक स्थान निर्माण केलेले, राम मंदिराच्या उभारणीत मौल्यवान योगदान दिलेले स्वामीजी सर्वांसाठी आदरणीय आहेत. त्यांचा सन्मान होणे ही समाधानाची गोष्ट आहे. चांगल्या कामासाठी निधी गोळा करण्याचे काम त्यांनी केले. उत्तम निरूपणासह देवकार्यासाठी मागण्याचे कौशल्य आणि विश्वास त्यांच्याकडे आहे. भगवदगीतेच्या प्रसारासाठी जगभर त्यांचे भ्रमण सुरु आहे. स्वामीजींसारख्या सत्पुरुषांनी सर्वसामान्य माणसाला सोप्या व सहज भाषेत गीता समजावून सांगण्याचे कार्य अधिक व्यापक करायला हवे. अनिष्ट रूढी, प्रथा व परंपरा छेद देऊन समाजाला विवेकाच्या मार्गावर आणण्याचे काम गुरुवर्यांनी करावे.”

(हेही वाचा Award : प.पू. गोविंददेव गिरिजी महाराजांच्या हस्ते ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांना ‘व्रतस्थ पत्रकारिता सन्मान’ पुरस्कार प्रदान)

विजय दर्डा म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत असताना स्वामीजींचा (Swami Govind dev giriji Maharaj) सन्मान माझ्या उपस्थितीत होतो आहे, हे माझे भाग्य आहे. स्वामीजींचे कार्य मोठे आहे. त्यांच्या विचारांचा, कार्याचा व समाज-धर्मासाठी दिलेल्या योगदानाचा हा सन्मान आहे. स्वामीजींचे कार्य भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र अशा स्वरूपाचे आहे. शिवरायांचे नाव घेताच आपल्यामध्ये नवचैतन्य संचारते. जोमाने काम करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या, समाजाला व देशाला घडविण्यात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना हेरून सन्मानित करण्याचे काम पत्रकार संघ करीत आहे. ‘पत्रकारिता परमो धर्म’ हा विचार घेऊन पत्रकारांनी समाज व राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे. रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या काही अडचणी आहेत. त्यांचे प्रश्न आहेत. बदलत्या काळानुसार त्यांच्यापुढे काही आव्हाने आहेत. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी पत्रकार संघाने आणखी काही चांगले उपक्रम हाती घ्यावेत. पत्रकारांनी संयम, नैतिकता सोडता कामा नये.

डॉ. योगेश जाधव म्हणाले, समस्त भारतीयांचे राम मंदिराचे स्वप्न साकारण्याच्या कार्यात स्वामीजींचे योगदान मोठे आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यातील त्यांचे भाषण स्मरणात राहणारे होते. त्यांच्यासमवेत  आज व्यासपीठावर बसता येणे हा आनंदाचा क्षण आहे. स्थानिक संस्कृतीशी नाळ जोडून, समाजाची दशा आणि दिशा ओळखून विधायक मार्ग दाखवण्याचे काम पत्रकारांनी करावे. पत्रकारिता वेगवान झाली आहे. मात्र, या वाढलेल्या वेगात गुणवत्ता आणि नैतिकता कमी होऊ न देणे, याचे दायित्व आपल्यावर आहे. याचे भान ठेवून आपण विवेकी पत्रकारिता करण्यावर भर दिला पाहिजे.”

कृष्णकुमार गोयल म्हणाले, महाराष्ट्ररासह देशाच्या अध्यामिक, सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्यारख्या पूजनीय व्यक्तिमत्वाचा सन्मान करून पत्रकार संघ एकप्रकारे त्यांचे आशीर्वादच घेत आहे. अशा या हृद्य सोहळ्यात कोहिनुर ग्रुपला सेवेची संधी मिळणे हा भाग्यदायी क्षण आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी कोहिनूरने नेहमीच पुढाकार घेतेलेला असून, समाजाच्या व पत्रकारांच्या कल्याणासाठी यापुढेही कार्यरत राहणार आहोत.”

यावेळी उद्योजक संजय मालपाणी, अभिनेता भाऊ कदम, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, संपादक संजय आवटे, ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर, अविनाश चिलेकर, ज्ञानेश्वर बिजले, बांधकाम व्यावसायिक विश्वास जावडेकर, गिरीराज सावंत, कलाकार ओंकार वासकर, ईश्वर गौरांगदास, राजेंद्र शिळीमकर, बाबा कांबळे,  निलेश खेडेकर, दशरथ भोसले, सिद्धार्थ भोकरे या कर्तव्यदक्ष उच्चपदस्थ अधिकारी, संपादक-पत्रकार व मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. किरण जोशी यांनी स्वागतपर भाषण केले. संजय भोकरे यांनी प्रास्ताविकात गोविंददेव गिरी महाराज यांच्याविषयी गौरवपूर्ण उल्लेख केला. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.