Summer Special MSRTC Bus : उन्हाळी सुट्ट्यांमुळे गावी तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने राज्य परिवहन (ST) महामंडळाने दररोज ७६४ विशेष बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळांना सुट्टी लागल्यानंतर, विद्यार्थी वाहतुकीसाठीच्या बस उपलब्ध झाल्याने त्यातून प्रवासी वाहतूक करून गर्दीचे व्यवस्थापन (Crowd management) करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. (Summer Special MSRTC Bus)
दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत एसटीतर्फे नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालविण्यात येतात. परंतु उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांबपल्ल्याच्या बससाठी मागणी वाढते. त्यासाठी या काळात शालेय फेऱ्या रद्द करून त्याऐवजी लांबपल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या जातात.
(हेही वाचा – Government Taxi : आता येणार सरकारी टॅक्सी ; अमित शाहांची संसदेत मोठी घोषणा)
जादा गाड्यांचे आरक्षण सुरू
उन्हाळ्याची सुट्टी (summer vacation) लक्षात घेऊन प्रवाशांची गर्दी होणाऱ्या मार्गांवर १५ एप्रिल २०२५ पासून टप्याटप्याने बसगाड्यांच्या जादा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने या काळात राज्यातील विविध मार्गांवर ७६४ जादा बस फेऱ्या चालविण्यास मंजुरी दिली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतील जादा बसगाड्यांचे तिकीट आरक्षण संगणकीय पद्धतीने उपलब्ध करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल ॲप, एसटी महामंडळाच्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रांवर जादा बसगाड्यांचे आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांनी उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवासाचे नियोजन करून महामंडळाच्या जादा बसगाड्यांच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community