पोलिस दलातील असाही एक ‘वाझे’ ! पोलिस उपाधीक्षकाने मागितली २ कोटींची लाच!

पोलिस उपधीक्षक राजेंद्र पाल मुंबई रेल्वे पोलिस विभागातून पदोन्नतीवर नुकतीच बदली होऊन परभणी येथे गेले होते.

अपघातात मृत्यू झालेल्या मित्राच्या पत्नीसोबत झालेल्या संभाषणाची व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणी कारवाई न करण्यासाठी पोलिस उपधीक्षकाने चक्क २ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार परभणी येथे उघडकीस आला. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा लाख रुपयांचा लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना पोलिस शिपायाला ताब्यात घेऊन पोलिस उपधीक्षकसह दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीतील धक्कादायक घटना!

राजेंद्र पाल आणि गणेश चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपधीक्षक आणि शिपायाचे नाव आहे. राजेंद्र पाल यांची मुंबई रेल्वे पोलिस विभागातून पदोन्नतीवर नुकतीच बदली होऊन परभणी येथे गेले होते. परभणी जिल्ह्यातील सेलू विभागाचे पोलिस उपधीक्षक म्हणून त्यांनी जानेवारी महिन्यातच पदभार स्वीकारला होता. परभणी जिल्ह्यातील एका अपघातात एका महिलेचा पतीच्या निधनानंतर ही महिला पतीच्या मित्राच्या संपर्कात होती. दरम्यान परभणीतील सेलू येथे राहणाऱ्या या महिलेचे आणि तिच्या मृत पतीच्या मित्राचे मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप तालुक्यात व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिप पोलिस उपाधीक्षक राजेंद्र पाल यांच्यापर्यंत येऊन पोहचली.

(हेही वाचा : ‘तो’ आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारा व्हिडिओ बनवतो! रेल्वेने घेतली गंभीर दखल)

लाचेची पहिला हप्ता होता १० लाख!

पाल यांनी या ऑडिओ क्लिपमधील इसमाला कार्यालयात बोलावून घेतले आणि व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे, यातून तुला बाहेर पडायचे असेल तर तुला २ कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी पाल यांनी केली. लाचेच्या रकमेत तडजोड करून ही रक्कम दीड कोटींवर नक्की करण्यात आली. दरम्यान लाचेचा पहिला हप्ता म्हणून १० लाख देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी याप्रकरणी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी उपाधीक्षक यांच्या कार्यालयात सापळा रचून १० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना पोलिस शिपाई गणेश चव्हाण याला ताब्यात घेतले. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात राजेंद्र पाल आणि शिपाई चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. राजेंद्र पाल यांनी लाचेची एवढी मोठी रक्कम मागितल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात तसेच पोलिस दलात सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here