सर्वोच्च न्यायालयाचेही Online RTI Portal सुरू होणार, न्यायालयातील ‘ही’ माहिती घरबसल्या मिळणार

माहितीच्या अधिकारांतर्गत नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमधील माहिती मिळवता येते. आता सर्वोच्च न्यायालयाने देखील आपलं ऑनलाईन आरटीआय पोर्टल(Online RTI Portal) सुरू केलं आहे. त्यामुळे आता माहितीच्या अधिकारांतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडून देखील ऑनलाईन माहिती मिळवणं शक्य होणार आहे.

सरन्यायाधीशांची घोषणा

2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार, हे आरटीआय पोर्टल सुरू करण्यात आले आहे. registry.sci.gov.in/rti_app या साईटवर आरटीआय अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी अर्जदाराला आधी आपलं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे. या अर्जासाठी अर्जदाराला 10 रुपये शुल्क देखील भरावं लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी गेल्या आठवड्यात एका सुनावणी दरम्यान ऑनलाईन आरटीआय पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली होती.

(हेही वाचाः ताज महालमध्ये नमाज पठण, व्हिडिओ व्हायरल! चौकशी होणार)

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

माहिती अधिकार कायदा, 2005 च्या कक्षेत सर्वोच्च न्यायालय देखील येते, असा निर्णय 2019 मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. सर्वोच्च न्यायालय हे देखील माहिती अधिकार कायद्यांतर्गत एक सार्वजनिक कार्यालय आहे. त्यामुळे न्यायालयातील कामकाजासंदर्भात नागरिकांना माहिती जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच सरन्यायाधीशांचं कार्यालय हे देखील एक सार्वजनिक कार्यालय असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले होते.

कोणती माहिती मिळणार?

सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीशांच्या कार्यालयाने दिलेल्या प्रशासकीय आदेशांबाबतच आरटीआय अंतर्गत माहिती मिळवता येणार असून, न्यायाधीशांच्या न्यायालयीन कामकाजाबाबत कोणतीही माहिती देण्यात येणार नाही. माहिती देताना कोणाचीही वैयक्तिक आणि गोपनीय माहिती सार्वजनिक केली जाणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here