राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे संसदेत विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर कायम हल्लाबोल करत असतात. त्याप्रमाणे सुप्रिया सुळे यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुनही मोदी सरकारला संसदेत घेरले. जेव्हा निवडणुका असतात, तेव्हा सरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत नाही. त्यामुळे दर महिन्याला निवडणुका घ्याव्यात, असा टोला सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला लगावला.
महिला अधिकाऱ्यांच्या आत्मसन्मानाचा मुद्दा मांडला
या सरकारला पाच राज्यातील जनतेने बहुमताने विजयी केले. पण निवडणुका संपताच या सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ केली. महागाई वाढलेली असतानादेखील ही दरवाढ करण्यात आली. जेव्हा निवडणुका असतात, तेव्हा सरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करीत नाही. आमचे तर म्हणणे आहे की, आपण दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे सरकार तिकडे व्यस्त राहील. परिणामी गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी यावेळी महिला अधिकाऱ्यांच्या आत्मसन्मानाचा मुद्दा देखील मांडला. अमरावतीच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग या दिल्ली येथे स्थायी समितीसमोर उपस्थित राहण्यासाठी आल्या असता, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या परवानगीशिवाय घेण्यात आले होते. महिला अधिकाऱ्यांच्या आत्मसन्मानाचा हा मुद्दा असून तो राखला जाणे आवश्यक आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.