पावसाळ्यात कोणतेही मॅनहोल उघडे राहू नये, पर्यायाने दुर्घटना घडू नये, याची खात्री करून घेण्यासाठी सोमवार, १९ जून २०२३ पूर्वी आपापल्या विभाग तथा खात्याच्या कार्यक्षेत्रातील मॅनहोलचे सर्वेक्षण करावे. तसेच, एकही मॅनहोल खुले / उघडे राहणार नाही, खबरदारी घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सर्व विभागांचे सहायक आयुक्त आणि मध्यवर्ती यंत्रणांचे प्रमुख अभियंता यांना दिले आहेत.
‘पावसाळा आला तरी मुंबईतील गटारांची झाकणे तुटकीच, अनेक ठिकाणी झाकणेच आहेत गायब’ अशा आशयाचे वृत्त हिंदुस्थान पोस्ट ने १३ जून रोजी प्रकाशित केले होते. मुंबई महापालिकेच्यावतीने मान्सून पूर्व तयारी केली जात असली तरी प्रत्यक्षात नाल्यांवरील झाकणे सुस्थितीत बसण्याबाबत कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नाही. एलफिन्स्टन येथील डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या अपघातानंतर महापालिका प्रशासन आजही दक्ष नसून अंधेरी, जोगेश्चरी, कांदिवली आणि बोरीवली या भागांमधील नाल्यांच्या मॅनहोलवरील सिमेंटची तसेच फायबरची झाकणे ही तुटलेल्या अवस्थेत आहेत, तसेच काही ठिकाणी झाकणेच गायब आहेत. परंतु या तुटलेल्या किंवा गायब झालेल्या झाकणांच्या जागी नवीन झाकणे बसवण्याचा प्रयत्न विभाग कार्यालय किंवा पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यामाध्यमातून केली जात नाही. त्यामुळे महापालिकेला डॉ. दीपक अमरापूरकर निर्माण करायचा आहे का असा सवाल या वृताद्वारे उपस्थित करण्यात आला होता.
(हेही वाचा Game Jihad : खेळ जिंकायचा असेल, तर 5 वेळा नमाज पठण करा; धर्मांतर करणाऱ्या टोळीची मोडस ऑपरेंडी)
‘हिंदुस्थान पोस्ट’ने मान्सून पूर्व तयारीचा भाग म्हणून या गटारावरील मॅनहोल्सच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने ही बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या वृत्ताची दखल घेत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला याबाबत विशेष सूचना करत, सोमवार, १९ जून २०२३ पूर्वी आपापल्या विभाग तथा खात्याच्या कार्यक्षेत्रातील मॅनहोलचे सर्वेक्षण करावे. तसेच, एकही मॅनहोल खुले अथवा उघडे राहणार नाही, याची खात्री करावी. असे या सूचनेत म्हटले आहे.
मुंबई महानगरातील मॅनहोल संदर्भात वारंवार सूचना देऊनही काही ठिकाणी मॅनहोल अद्यापही खुले असल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने मॅनहोलसंदर्भात केलेल्या आणि करण्यात येणा-या विविध उपाययोजनांबाबत उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला शपथपत्र सादर करण्याचे निर्देशही दिले होते.
पावसाळ्यात कोणतेही मॅनहोल उघडे राहू नये, पर्यायाने दुर्घटना घडू नये, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांचे सहायक आयुक्त आणि मध्यवर्ती यंत्रणांचे प्रमुख अभियंता यांना आयुक्तांनी, मॅनहोलचे सर्वेक्षण करावे अशा सूचना केल्या आहेत. तसेच या मुदतीनंतर यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल,असाही इशारा दिला आहे.
Join Our WhatsApp Community