खाद्यतेलाच्या नमुन्यांचे होणार सर्वेक्षण

दैनंदिन जीवनात विविध अन्न पदार्थ बनविण्याकरिता खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे सर्व नागरिकांना चांगल्या दर्जाचे खाद्यतेल मिळावे, याकरीता अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यतेलाच्या नमुन्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

( हेही वाचा : अधिवेशनाची तयारी : मंत्रिमडळ विस्ताराआधीच संभाव्य मंत्र्यांकडून खात्यांचा अभ्यास सुरू )

१ ते १४ ऑगस्टपर्यंत मोहीम

केंद्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार, संपूर्ण राज्यात खाद्यतेल, वनस्पती, तसेच बहुस्त्रोत खाद्यतेलाच्या अनुषंगाने ही सर्वेक्षण मोहीम १ ते १४ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत असून, या कालावधीत स्थानिक व नामांकित मोठ्या ब्रँड्सच्या खाद्यतेलाचे नमुने सर्वेक्षणासाठी घेऊन विश्लेषण केले जाणार आहे. बहु स्त्रोत खाद्यतेलाची विक्री परवान्याशिवाय करता येत नाही. तथापि, ही बाब देखील तपासण्यात येणार आहे. सुट्या खाद्यतेल विक्रीस प्रतिबंध असल्याने सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवरही कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

एकूण १६ नमुन्यांची तपासणी

या मोहिमेअंतर्गत ४ ऑगस्ट रोजी पुणे विभागात खाद्यतेलाचे एकूण १६ सर्वेक्षण नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या सर्वेक्षण नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कमी दर्जाचे खाद्यतेल विक्रेत्यांकडून नियमित अन्न नमुने घेऊन कायद्याअंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here