सुशांतच्या मृत्यूचा तपास सध्या एनसीबी, सीबीआय आणि ईडी हे विभाग करत आहेत. यातून तपास योग्य दिशेने आणि जलदगतीने व्हावा म्हणून एनसीबी आता नव्या एसआयटी अर्थात स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमची स्थापना करणार असल्याचं कळतंय. तर सीबीआयशी संलग्न काम करणाऱ्या एम्सच्या डॉक्टरांच्या टीमनेही ही सुसाईड नसून होमिसाईड असल्याचं म्हटलं आहे. यामुळे येत्या काळात हा गुंता आणखी वाढणार आहे यात शंका नाही.
या मुद्द्यावर अधिकृत कोणी बोलायला तयार नाही. पण त्यात काम करणाऱ्या मंडळींकडून ही मिळालेली माहीती आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचं गूढ आता वाढू लागलं आहे. एकिकडे नार्कोटिक्स कमिशन ब्युरोने रिया चक्रवर्ती, दिपेश सावंत, शोविक चक्रवर्ती यांच्या चौकशीवरचा जोर वाढवला आहे. तर दुसरीकडे सीबीआयही आपल्या तपासाच्या अंतिम टप्प्यानजिक पोहचलं आहे. आता सीबीआयने सुशांतची मैत्रीण आणि एका पीआर कंपनीची मालक असलेल्या रोहिणी अय्यरला चौकशीसाठी बोलावलं आहे. एम्स डॉक्टरांची टीमही याचा कसून तपास करत असून, ही सुसाईड नसून होमीसाईड आहे यावर हे पथक ठाम होतं आहे.
एम्स डॉक्टरांची टीम मुंबईत दाखल झाल्यानंतर या समितीसाठी सुशांतच्या त्या घटनेचे नाट्य रिक्रिएट करण्यात आलं होतं. त्यानंतर या टीमने सुशांतच्या गच्चीचा कसून तपास केला. ही टीम गच्चीवर दोन तास होती. त्यानंतर सुशांतचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आणि एकूण त्याच्या शरीरावरच्या खुणा पाहता ही हत्या असल्याच्या निष्कर्षावर एम्सचे लोक ठाम होताना दिसत आहेत. यासाठी सुशांतवर काही विषप्रयोग झाला होता का हे पाहण्यासाठी सुशांतचा व्हिसेरा अहवाल पुन्हा एकदा तपासला जाणार आहे. या व्हिसेरा अहवालातून सुशांतवर विषप्रयोग झाला होता की नाही हे कळेल.
17 सप्टेंबरला होणार बैठक?
एम्सच्या डॉक्टरांची यासंबंधी एक महत्वाची बैठक होणार आहे. ही बैठक सध्या 17 सप्टेंबरला होणार असल्याचं कळतं. या बैठकीनंतर एम्सचे डॉक्टर आपला अहवाल सादर करतील असं बोललं जातं. शिवाय त्या पुढचा तपास कसा करायचा तेही यावेळी ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरला मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community