भिवंडीपाठोपाठ गोवंडीतील गोवरबाधित बालकाचाही मृत्यू झाल्याची माहिती शुक्रवारी पालिका आरोग्यविभागाने दिली. पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीत तफावत असल्याने अखेरीस शुक्रवारी पालिकेने दोन बालकांचा गोवरच्या संशयाने मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण दिले. या मृत्यूमुळे आता गोवरबाधित संशयास्पद मृत्यूंची संख्या ८ वर पोहोचली आहे. भिवंडी आणि गोवंडीतील चिमुरड्यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार दिले गेले. शरीरावर पूरळ दिसून आलेले असतानाही गोवरसंशयित उपचार तातडीने सुरु का नाही गेले, हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
( हेही वाचा : गोवंडीत लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या इंटर्न्सना ना बसची सोय ना पाण्याची… )
तीन दिवस मुलीच्या उपचारांसाठी पालकांची धडपड
६ महिन्यांच्या मुलाचा गुरुवारी कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ३ नोव्हेंबर रोजी गोवंडीत राहणा-या १० महिन्यांच्या मुलीचाही ३ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. ठाण्यात राहणारी ही मुलगी ३१ ऑक्टोबर रोजी दोन दिवस गोवंडीत राहण्यासाठी गेलेली असताना तिला ताप आणि पुरळ आले. सुरुवातीला तिला खासगी दवाखान्यात उपचार दिले गेले. मुलीची तब्येत ढासळल्याने पालकांनी तिला चेंबूर येथील खासगी रुग्णालयात नेले. खासगी रुग्णालयाने लहान मुलीला श्वसनाचा त्रास होत असल्याने पालिका रुग्णालयात पाठवले. पालिका रुग्णालयात मुलीसाठी अतिदक्षता विभागात खाट न मिळ्याने अखेरिस पालकांनी तिला वाडिया रुग्णालयात दाखल केले. या संपूर्ण धावपळीत दुसरा दिवस उजाडला. २ नोव्हेंबर रोजी मुलीला वाडिया रुग्णालयात पालकांनी दाखल केले. मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला उपचारांसाठी कृत्रिम श्वासोच्छवास मिळावा म्हणून पालकांनी पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णालयात नेतानाच ३ नोव्हेंबरला चिमुरडीचा मृत्यू झाला.
भिवंडीतील सहा महिन्यांच्या मुलाला चार दिवस खासगी रुग्णालयात उपचार
भिवंडीत राहणाऱ्या ६ महिन्यांच्या मुलाला ७ नोव्हेंबरपासून ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला. तीन दिवसानंतर त्याच्या शरीरावर पूरळ दिसून आले. तीन दिवस मुलाला खासगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात उपचार सुरु होते. पुरळ दिसून आल्यानंतर बाळाला पालकांनी खासगी रुग्णालयात हलवले. १३ नोव्हेंबर रोजी बाळाला पालकांनी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान १७ तारखेला बाळाचा मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community