देशातील स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

244

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०’ हे २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. स्वच्छता अॅपवरुन १ कोटी ७० लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मीडियावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला. तर साडे पाच लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडण्यात आलं. याआधी ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत कचरामुक्त शहर मोहिमेत देशातील पाच शहरांत नवी मुंबईला स्थान मिळाले होते. नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. पाहणीच्या आधारे कचरामुक्त शहराचा दर्जा ठरविण्यात आला होता. यावेळी नवी मुंबईला पंचतारांकित दर्जा मिळाला होता. देशातील पाच शहरांत नवी मुंबईचा समावेश झाला होता, तसंच राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. गेल्या वर्षीही नवी मुंबईने हा दर्जा मिळवला होता. गतवर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान मिळविलं होतं. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळालं होतं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.