स्वरसम्राज्ञी लतादीदींच्या स्मृती प्रीत्यर्थ हाजीअली जंक्शनवर साकारणार ‘स्वरांचा कल्पवृक्ष’

181

स्वरसम्राज्ञी, भारतरत्न (दिवंगत) लता मंगेशकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ‘स्वरांचा कल्पवृक्ष’ हा स्मृतिस्तंभ मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व लोढा फाऊंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे. या स्तंभाचे भूमिपूजन लतादीदींच्या भगिनी उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते व राज्याचे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले.

भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून हा छोटेखानी सोहळा सोमवारी पार पडला. डी विभागातील वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली जंक्शन, ताडदेव) येथील वाहतूक बेटामध्ये ‘स्वरांचा कल्पवृक्ष’ या संकल्पनेवर आधारित स्मृती स्तंभ उभारण्यात येणार आहे. तसेच मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाचा भाग म्हणून, डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड) येथील मंगेशकर कुटुंबियांच्या ‘प्रभूकूंज’ या निवासस्थानाच्या दर्शनी भिंतीवर भित्तिशिल्प देखील साकारण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री तथा स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ही कामे हाती घेण्यात आली आहेत.

या दोन्ही कामांच्या भूमिपूजनप्रसंगी मीनाताई मंगेशकर-खडीकर, आदिनाथ मंगेशकर, प्रसिद्ध गायक नितीन मुकेश, प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, मंगेशकर कुटुंबातील इतर सदस्य, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे व अन्य मान्यवर देखील उपस्थित होते.

‘स्वरांचा कल्पवृक्ष’ स्तंभाची ठळक वैशिष्ट्ये:

  • हा स्तंभ स्टील व खरेखुरे झाड यांचा वापर करून साकारण्यात येणार आहे.या स्तंभाची ऊंची सुमारे ४० फूट असेल.
  • झाडाच्या सतत वाढीस चालना देण्यासाठी पूर्णपणे मातीचा वापर करण्यात येणार आहे. जादुई स्वरुपाचे रूपक तयार करण्यासाठी मिरर स्टील उपयोगात आणले जाणार आहे.
  • या स्तंभाच्या कलाकृतीतून धरतीचे आकाशाशी झालेले मीलन चित्रित करण्यात येणार आहे.
  • ‘प्रभूकूंज’ निवासस्थानाच्या दर्शनी भिंतीवरील भित्तिशिल्पाची ठळक वैशिष्ठ्ये:
  • या भित्तिशिल्पातून लता मंगेशकर यांच्या जीवनप्रवासातील ठळक तसेच विशेष उल्लेखनीय प्रसंग दर्शविण्यात येणार आहेत.
  • क्यू आर कोडच्या माध्यमातून लतादीदींच्या विशेष छबी, सादरीकरणाची चित्रणे, नावाजलेली अजरामर गीते, सहकार्‍यांची मनोगते इत्यादी बाबी अंतर्भूत करण्याचे देखील नियोजित आहे.
  • हे भित्तिशिल्प ४० फूट लांब व १५ फूट रुंद आकाराचे असेल. त्यावर आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.