स्वतःवर उपचार नाकारून तरुणाला दिले जीवनदान! स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांचे समर्पण! 

माझे वय 85 असून मी भरपूर जगून घेतले आहे. या महिलेचा पती तरुण असून त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे माझा ऑक्सिजन बेड त्याला द्या, असे संघ स्वयंसेवक नारायण दाभाडकर डॉक्टरांना म्हणाले. 

मृत्यु हा अटळ आहे, मात्र प्रत्येकासाठी त्याचे कारण निराळे असते. परंतु काही जण मृत्यूसमयी देखील काहीतरी विलक्षण करून जातात. नारायण दाभाडकर, संघ स्वयंसेवक, वय वर्ष 85 यांना कोरोनावरील उपचारासाठी वर्ध्यातील इंदिरा गांधी सरकारी रुग्णालयात आणले जाते, त्याचवेळी एक महिला ऑक्सिजन लावलेल्या स्थितीत चाळीशीतल्या तिच्या नवऱ्याला ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी आकांत करताना ते पाहतात. आणि नारायण दाभाडकर डॉक्टरांना म्हणतात, ‘मी माझे आयुष्य जगून पूर्ण केले आहे. हा तरूण जगला पाहिजे. याकरिता माझा ऑक्सिजन बेड त्याला द्या.’ डॉक्टर त्याप्रमाणे लेखी संमतीने बेड देतात आणि नारायण दाभाडकर यांना घरी पाठवले जाते. त्यानंतर तीन दिवसांनी मृत्यू त्यांना सन्मानाने घेऊन जातो.

परोपकाराचे महत्त्व अधोरेखित केले!

द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी समस्त स्वयंसेवकांना ‘सेवेच्या यज्ञकुंडात समिधा बनावे’, असा उपदेश दिला होता. त्यांचा तो उपदेश स्वयंसेवक आदेश म्हणून पालन करतात. अशा निष्काम आणि सेवाभावी स्वयंसेवकांमध्ये नारायण दाभाडकर हे नाव जोडले गेले आहे. कोरोना या महामारीत सध्या ऑक्सिजन, औषधे आणि रुग्णालयात जागा यापैकी काहीही सहजासहजी मिळत नाही. अशा परिस्थितीतही नागपुरातील नारायण भाऊराव दाभाडकर या 85 वर्षीय संघ स्वयंसेवकाने रुग्णालयातील बेड नाकारून एका तरुणासाठी जागा मोकळी करून दिली आणि आनंदाने जगाचा निरोप घेतला, परंतु त्याआधी परोपकाराचे महत्त्व अधोरेखित केले.

(हेही वाचा : बीडची परिस्थिती विदारक! अंत्यसंस्कारांचेही  नियोजन करा! उच्च न्यायालयाचे निर्देश )

माझे आयुष्य जगून झाले आहे… 

गेल्या काही वर्षांपासून नारायण दाभाडकर हे वर्धा मार्गावरील सावित्रिविहार येथे आपली मुलगी आसावरी कोठीवान यांच्याकडे वास्तव्याला होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागणी झाली. दाभाडकर यांचे वय अधिक असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यांची ऑक्सिजन पातळी 60 पर्यंत खाली गेली. त्यामुळे दाभाडकर यांच्या जावयांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. खूप प्रयत्नानंतर दाभाडकर यांच्यासाठी खाटेची व्यवस्था झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच तिथे एक महिला आपल्या 40 वर्षीय कोरोनाबाधित नवऱ्याला घेऊन पोहचली. रुग्णालयात जागा नसल्यामुळे त्या महिलेला रडू कोसळले. त्या महिलेची अवस्था पाहून नारायण दाभाडकर यांनी स्वतःचा बेड त्या महिलेच्या पतीला देण्याची विनंती रुग्णालय प्रशासनाला केली. त्याचप्रमाणे सदर रुग्णासाठी आपला बेड रिकामा करीत असल्याचे त्यांनी रुग्णालयाला लिहून दिले. यावेळी दाभाडकर म्हणाले की, ‘माझे वय 85 असून मी भरपूर जगून घेतले आहे. या महिलेचा पती तरुण असून त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना भर्ती करून घ्यावे’. स्वतःची प्रकृती क्षणोक्षणी खालावत असूनही दुसऱ्यासाठी रुग्णालयात बेड रिकामा करून दाभाडकर घरी परतले. परंतु, तीन दिवसांनी त्यांचे निधन झाले.

लहानपणापासून होते स्वयंसेवक!

कै. नारायण दाभाडकर हे सच्चे स्वयंसेवक होते. दाभाडकर लहान मुलांना चॉकलेट वाटायचे. त्यामुळे मुले त्यांना चॉकलेट काका म्हणत. सच्चे स्वयंसेवक असलेल्या दाभाडकर यांच्या स्वभावात चॉकलेटचा गोडवा होता. त्यामुळे जगाचा निरोप घेण्यापूर्वी स्वयंसेवक म्हणून ते सेवेच्या यज्ञात समिधा बनले आणि आपल्या योगदानातून समाजासाठी अनुकरणीय गोडवा मागे सोडून गेले, अशी प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चाच्या नागपूर शहराध्यक्ष शिवानी दाणी-वखरे यांनी दिली.

एक प्रतिक्रिया

  1. आपल्या कृतीतून त्यागाची शिकवण देणाऱ्या नारायण दाभाडकर यांना मनोमन प्रणाम! देशासाठी प्राण देणारे जवान सोडल्यास इतके धैर्य क्वचितच कुणी दाखवते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here