सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो; CM Eknath Shinde यांनी काढले गौरवोद्गार

147
सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो; CM Eknath Shinde यांनी काढले गौरवोद्गार

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०१४ साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे मुंबईचे प्रदूषण खूप कमी झाले आहे. याकामी सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो आहे”, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काढले.

‘स्वच्छता ही सेवा २०२४ (SHS)’ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ गुरुवारी (१९ सप्टेंबर) मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्‍त अश्विनी भिडे, सेना दलाचे अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सफाई कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – Matka King Suresh Bhagat Murder Case : महिला पोलिसांना धक्काबुकी केल्याप्रकरणी आरोपी मांडवीकरला अटक)

यासाठी राबवणार त्रिसुत्री नियोजन

या अभियानासाठी कार्यक्रमासाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग, विविध प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) मिळून सुमारे १ हजार कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) अंतर्गत ३ महाराष्ट्रीय बटालियनचे २५० विद्यार्थी, मारवाडी विद्यालय, जे.जे. गर्ल्स हायस्कूल, सेंट झेवियर्स स्कूल (गोरेगाव) चे विद्यार्थी तसेच विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आजच्या स्वच्छता मोहिमेसाठी ४ डंपर, ४ जेसीबी, ३ मिनी कॉम्पॅक्टर, ४ लहान वाहने, बीच क्लिनिंग मशीन (१), बॉब कॅट मशीन आदी संयंत्रांचा वापर करण्यात आला. स्वराज्यभूमीवर राबवलेल्या या उपक्रमातून सुमारे ३० मेट्रिक टन कचरा संकलन करण्यात आले.

मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शुभारंभ केलेले हे राज्यस्तरीय अभियान महात्मा गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातील नागरी व ग्रामीण भागात ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता पंधरवडा मोहिमेकरिता सर्वांची भागीदारी असायली हवी, असे आवाहन मुख्यमंत्री  शिंदे यांनी केले. ते म्हणाले की, स्वच्छता ही सेवा अभियानाच्या उपक्रमाद्वारे आर.आर.आर. (रिड्युस, रियूज, रिसायकल) केंद्र उभारून पर्यटन स्थळावर शुन्य कचरा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमअंतर्गत वृक्षारोपण आणि सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर नियमित स्वच्छ न होणारी ठिकाणे शोधण्यात आली असून अशी ठिकाणे कायमस्वरूपी स्वच्छ राहतील, याकरिता त्रिसुत्री नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यंदा मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यात दीड लाख झाडे लावली आहेत. या अभियानामध्ये  ९,३५९ कार्यक्रमाची नोंदणी झाली आहे. क्लिनलीनेस टार्गेट युनिट (सीटीयू) अंतर्गत ४५२० ठिकाणे शोधली असून या ठिकाणचा कचरा उचलला जाणार आहे. याकरिता जनसहभागाचे ४१११  कार्यक्रम राबविले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाल्यानंतर स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे मुख्यमंत्र्यांनी स्वत: स्वच्छतेची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालवून बीच क्लिनिंग मशीनद्वारे कचरा संकलन केले. त्याचबरोबर ‘करूया वाईट विचार नष्ट, स्वच्छ  करूया आपला महाराष्ट्र’ असा संदेशही फलकावर लिहून स्वाक्षरी केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.