तायक्वांडो शिकणा-या तरुणीने विनयभंग करणा-याला दिला चोप, धाडसाचे होत आहे कौतुक

100

महिलांवरील अत्याचार, गर्दीच्या ठिकाणी महिलांवर होणारे हल्ले याबाबतच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या किंवा वाचल्या असतील. त्यामुळे देशात आणि राज्यात महिलांची सुरक्षितता याबाबत कायमंच चिंता व्यक्त करण्यात येते. पण महिला सक्षम असतील तर त्या कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतात, याची ओळख करुन दिली आहे ती कल्याणमधील एका तरुणीने.

स्वातंत्र्यवीर सावरकर तायक्वांडो अकॅडमीची विद्यार्थिनी असलेल्या या तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न मंगळवारी संध्याकाळी करण्यात आला. त्यावेळी या तरुणीने न घाबरता आपल्या तायक्वांडो प्रशिक्षणाचा वापर करत विनयभंग करणा-याला चांगलाच चोप दिला. त्यामुळे तरुणीच्या या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.

(हेही वाचाः पोयसर तिरंदाजी स्पर्धेत स्वातंत्र्यवीर सावरकर आर्चरी क्लबच्या तिरंदाजांचे घवघवीत यश)

विनयभंग करण्याचा प्रयत्न

कल्याणची रहिवासी असलेली तरुणी कामानिमित्त कल्याण ते घाटकोपर असा रोज प्रवास करते. त्याचबरोरबर दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर तायक्वांडो अकॅडमीमध्ये ती तायक्वांडोचे प्रशिक्षण देखील घेते. मंगळवारी संध्याकाळी 7-7.30 च्या सुमारास ही तरुणी ऑफिसमधून घरी जाण्यासाठी निघाली. रिक्षाची वाट बघत असताना रस्त्यावरील गर्दीचा फायदा घेत एका कंटकाने तिला स्पर्श करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने मद्यपान केले असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. या प्रकारामुळे तरुणी चांगलीच संतापली.

वीट भिरकावत केला हल्ल्याचा प्रयत्न

तिने एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या तायक्वांडो प्रशिक्षणाचा वापर करत त्याला लाथा-बुक्क्यांनी हाणले. तिच्या या कृतीमुळे आजूबाजूचे लोकही तिच्या मदतीला धावून आले. आपल्याला एका मुलीने सर्वांसमोर चोपल्यामुळे त्या कंटकाचा पुरुषी अहंकार दुखावला गेला. त्यानंतर ती रिक्षेत बसली असता त्याने तिच्या दिशेने वीट भिरकावत तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्याचा तो हल्ला चुकवला. त्यानंतर मात्र घाबरलेल्या हल्लेखोराने तिथून पळ काढला. पण तरुणीने दाखवलेल्या धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

(हेही वाचाः ‘आठवड्यातून रविवार आले ना रे तिनदा’, 100 कंपन्यांनी कर्मचा-यांना दिली आठवड्यातून तीन दिवसांची सुट्टी)

महिलांनी स्वसंरक्षणासाठी सक्षम व्हायची गरज

तरुणीच्या या धाडसाबाबत तिला विचारले असता, तायक्वांडो प्रशिक्षण घेण्यापूर्वी सुद्धा आपल्यावर अशाच प्रकारे एकदा हल्ला झाल्याचे तिने सांगितले. पण त्यावेळी ती घाबरुन गेली होती आणि तिने प्रतिकार केला नव्हता. पण स्वातंत्र्यवीर सावरकर तायक्वांडो अकॅडमीच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणाचा फायदा तिला यावेळी झाला आणि तिने हल्लेखोराला चांगलाच धडा शिकवला. त्यामुळे तिने सर्व प्रशिक्षकांचे आभार मानले असून महिलांनी स्वसंरक्षणासाठी स्वतःला सक्षम करण्याची गरज असल्याचेही तिने सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.