स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर क्रीडा प्रबोधिनीचे तायक्वांदोचे प्रशिक्षण वर्ग चालवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रशिक्षक राजेश खिल्लारे (Rajesh Khilari) यांच्यावर बुधवार, २९ जानेवारीला स्मारकाच्या प्रवेशद्वाराबाहेर ३ अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राजेश खिल्लारे यांच्या डोक्याला काही खोल जखमा झाल्या आहेत. त्यांना तात्काळ हिंदूंजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात जावून खिल्लारे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. या हल्ल्याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
(हेही वाचा तपासात दिरंगाई होत असल्याचे कारण देत Bombay High Court ने पानसरे हत्याकांडातील सहा आरोपींना दिला जामीन )
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे राजेश खिल्लारे (Rajesh Khilari) हे स्मारकातील तायक्वांदो प्रशिक्षणाचा वर्ग आटोपून बुधवारी संध्याकाळी घरी परतण्यासाठी निघत होते. त्याआधी त्यांच्या वर्गातील एक विद्यार्थी स्मारकातून बाहेर पडताच स्मारकाच्या प्रवेशद्वाराकडे त्या विद्यार्थ्याशी तीन अज्ञात व्यक्तींनी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्या विद्यार्थ्याला या लोकांच्या तोंडातून दारूचा वास आल्याने तो पुढे निघून गेला. त्यानंतर तिथे राजेश खिल्लारे (Rajesh Khilari) आले. या अज्ञातांनी खिल्लारे यांच्यासोबतही वाद घालायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली, तेव्हा या तीन अज्ञातांपैकी एकाने खिल्लारे यांच्या डोक्यात मोठे लाकूड मारले. यामुळे खिल्लारे यांच्या डोक्यावर काही गंभीर जखमा झाल्या. रक्तबंबाळ अवस्थेत खिल्लारे यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. हिंदूंजा रुग्णालयात खिल्लारे यांच्यावर लगेच प्राथमिक उपचार सुरु करण्यात आले. पोलिसांनीही तात्काळ रुग्णालयात जाऊन या हल्ल्याची माहिती घेतली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Join Our WhatsApp Community