कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांची व कुटुंबियांची काळजी घ्या! अनिल परब यांचे आदेश

कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घ्या, त्यांना तातडीने उपचार मिळवून द्या, असे निर्देश एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी एसटी महामंडळाच्या बसेस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत आहेत. टाळेबंदीच्या काळात फ्रंट लाईन वर्कर म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असून, अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे अशा कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घ्या, त्यांना तातडीने उपचार मिळवून द्या, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अनिल परब यांनी घेतला आढावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. राज्यात संचारबंदी असली तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी, एसटीचे चालक-वाहक यशस्वीपणे पार पाडत आहेत. ही जबाबदारी पार पाडत असताना एसटीच्या चालक-वाहकांबरोबरच महामंडळाच्या अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. मात्र, त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांना मृत्यूनेही गाठले आहे.

(हेही वाचाः परिवहन मंत्र्यांचे ‘ते’ पत्र म्हणजे दिशाभूल?)

तातडीने उपचार मिळवून द्या

कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने उपचार मिळावे, यासाठी महामंडळाच्यावतीने राज्यभरात विभागीय पातळीवर समन्वय कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. एसटी महामंडळ हे एक कुटुंब असून कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीला तातडीने उपचार मिळावे, यासाठी जिल्हास्तरावर कामगार अधिकाऱ्यांकडे समन्वय करण्याची जबाबदारी देण्यात यावी व त्याचा नियमित आढावा घ्यावा. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घ्या, त्यांना तातडीने उपचार मिळवून द्या, असे निर्देशही एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी अधिकाऱ्यांना दिले.

एसटीमधील बदलांसाठी मागवला अहवाल

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना तातडीने सेवेत घेण्याबाबत त्वरित प्रस्ताव सादर करावा, असेही अनिल परब यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घोषित केलेल्या टाळेबंदीमुळे एसटीच्या उत्पनावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे टाळेबंदीनंतर एसटीचे उत्पन्न कशा पद्धतीने वाढवले जाईल व त्या अनुषंगाने एसटीमध्ये काय बदल करणे आवश्यक आहे, याचाही अहवाल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी मागवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here