कोकणात गणेशोत्सवाची तयारी सुरु; प्रशासनाने दिल्या ‘या’ सूचना

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त जिल्ह्यातील कोकणात येतात. या गणेशभक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. या कालावधीत वाहतूक सुरळीत राहील याची विशेष काळजी घ्यावी. नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी विविध स्पर्धांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केल्या आहेत.

वाहनांची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी

सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणाची व्यवस्थित माहिती देण्यात यावी. कायदा व सूव्यवस्थेच्या दृष्टीने फिरती पोलीस पथकांचे नियोजन करावे. रहदारीच्या ठिकाणी वाहनांची कोंडी होणार नाही, महामार्गावर वाहतुकीस अडथळा होणारी घटना घडल्यास क्रेन व जेसीबीची सोय करावी. महामार्गानजीकचे ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे खासगी रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक असावेत. गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वे येणार आहेत. त्यासाठी परिवहन महामंडळाने तेथून गावी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. महावितरणने वीज व्यवस्था सुरळीत राहील यासाठी साधनसामग्री, मनुष्यबळ याची व्यवस्था करावी. गणेश मूर्ती आगमन मार्ग तसेच विसर्जन मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करुन घ्यावी. सर्वच यंत्रणांनी समन्वयाने गणेशोत्सव उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने पार पडेल यासाठी प्रयत्न करावेत. असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले आहे.

आपत्कालीन सुविधा

पोलीस अधिक्षक दाभाडे म्हणाले, गणेशोत्सव पूर्व 2 दिवस आधी विशेषतः पोलीस महामार्ग सुरक्षा पोलीस, वाहतूक पोलीस यांनी दक्ष राहून वाहतुकीची कोंडी होणार नाही याचे नियोजन करावे. रात्रीच्या वेळी वळणांवर घाट मार्गावर रिफ्लेक्टर बसवावेत. कोणतेही अपघात होणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने आपल्या रुग्णवाहिका तैनात ठेवाव्यात.

निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण यांनी विशेषतः घाट मार्गांबाबत दक्ष राहून तात्काळ दुरुस्तीची कामे सुरु करावीत. रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत. काही कारणास्तव गणेशभक्तांना घेऊन येणाऱ्या रेल्वे थांबल्यास त्यांच्या खाण्याची व पाण्याची सोय रेल्वे विभागाने करावी. महामार्गाजवळच्या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी आपत्कालीन सुविधा ठेवावी.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here