केंद्रीय शिक्षण मंडळाचे विद्यार्थी अकरावी सीईटीबाबत चिंतेत! 

अकरावी प्रवेशासाठी परीक्षा देणाऱ्या प्रत्येक मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असायला हवा, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही ऐच्छिक असणार आहे. परंतु जे ही परीक्षा देतील त्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाईल असे सरकारने म्हटले आहे. मात्र सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमाच्या आधारे घेणार आहे, मात्र सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम वेगळा आहे, अशा वेळी या विद्यार्थ्यांची गोची होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने याप्रकरणी योग्य तो तोडगा काढा, अशी सूचना केली आहे.

सरकारने भूमिका स्पष्ट करावी!

या प्रवेश परीक्षेकरिता सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र अभ्यासक्रम असणार आहे का? वा तसे नसल्यास ही परीक्षा देणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार का? अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. अकरावी प्रवेशासाठी परीक्षा देणाऱ्या प्रत्येक मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असायला हवा. त्यासाठी प्रत्येक मंडळाला अभ्यासक्रम ठरवण्याची मुभा असावी, असे मतही न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश देताना व्यक्त केले. त्याच वेळी सीबीएसई आणि आयसीएसई मंडळांना याप्रकरणी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यान सरकारने सीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे राज्य सरकारतर्फे  स्पष्ट करण्यात आल्यावर याप्रकरणी तोडगा काढण्याची सूचना न्यायालयाने केली.

याचिकाकर्त्यांचे काय आहे म्हणणे?

सरकारच्या अधिसूचनेनुसार, ज्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश हवा आहे तेच ही परीक्षा देऊ शकतील. परंतु राज्य मंडळ आणि अन्य मंडळांच्या अभ्यासक्रमात फरक आहे. राज्य सरकारचे सीईटीसाठीचे निकष हे राज्य मंडळ आणि अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोप याचिकाकर्तीतर्फे करण्यात आला आहे.

सरकार म्हणते सीईटी द्यावीच लागेल!

या वर्षी एकाही मंडळाने दहावीची परीक्षा घेतलेली नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना समान वागणूक द्यायला हवी. अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी बंधनकारक केलेली नाही. शिवाय अन्य मंडळाचे विद्यार्थी त्याच मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेऊ शकतात, परंतु या विद्यार्थ्यांना राज्यातील अन्य कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश हवा असल्यास त्यांना सीईटी द्यावीच लागेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here