पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर.बायडेन यांनी नवी दिल्लीत झालेली निवांत भेट त्यांच्या विशेष मैत्रीची चर्चा घडविणारी ठरली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले असून नवी दिल्लीत होणाऱ्या जी – २० शिखर परिषदेत ते सहभागी झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोणार्क चक्राविषयी त्यांना विशेष माहिती दिली. दोन्ही प्रमुख नेत्यानीं उत्साहात हँडशेक तर केलाच शिवाय गळाभेट पण दिली हे विशेष.
ज्यावेळी पंतप्रधान अमेरिकेत गेले होते तेव्हा देखील त्यांनी मोदींचे विशेष स्वागत केले होते. सामायिक लोकशाही मूल्य, धोरणात्मक दृष्टिकोनातल्या वाढत्या अभिसरणाबद्दल आणि लोकांचे लोकांशी दृढ होत असलेले संबंध या घटकांवर आधारित असलेली भारत – अमेरिका यांच्यातील जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या दूरदृष्टी आणि वचनबद्धतेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
दोन्ही नेत्यांनी पंतप्रधानांच्या जून 2023 मध्ये झालेल्या ऐतिहासिक अमेरिका भेटीदरम्यान, भारत-अमेरिका ‘इनिशिएटिव्ह फॉर क्रिटीकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी (iCET) सह इतर विविध मुद्यांवर झालेल्या चर्चेच्या भविष्यवेधी आणि व्यापक फलनिष्पत्तीच्या अंमलबजावणीच्या प्रगतीची प्रशंसा केली.
(हेही वाचा – G-20 Summit : जी-20 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात, मानवकेंद्रित आणि सर्वसमावेश विकासाचे नवे पर्व )
संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य, संशोधन, नवोन्मेष, संस्कृती आणि दोन्ही देशांमधील जनतेचे परस्परसंबंध यांच्यासह द्विपक्षीय सहकार्याला मिळालेल्या चालनेतील सातत्याचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.
अध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचे चंद्रयान-3च्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील ऐतिहासिक लँडिंगबद्दल अतिशय जिव्हाळ्याने अभिनंदन केले आणि दोन्ही देशांदरम्यान अंतराळ क्षेत्रातील वाढते सहकार्य अधोरेखित केले.
दोन्ही नेत्यांनी अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांबाबतही परस्परांशी विचारांची देवाणघेवाण केली. भारत-अमेरिका भागीदारी ही केवळ या दोन देशांच्या जनतेसाठीच नव्हे तर जागतिक कल्याणासाठी देखील फायदेशीर असल्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.
भारताच्या जी20 अध्यक्षतेच्या यशस्वितेसाठी अमेरिकेकडून सातत्याने मिळालेल्या पाठबळाबद्दल पंतप्रधानांनी अध्यक्ष बायडेन यांचे आभार मानले.
हेही पहा –