-
ऋजुता लुकतुके
जागतिक अस्थिरतेचा फटका भारतीय शेअर बाजारांनाही बसला आणि शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक दीड टक्क्यांनी कोसळले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला जगातील विविध देशांवर आयात शुल्क वाढीचा आघात केला. यात भारतावर त्यांनी २६ टक्के आयात शुल्क लादलं आहे. त्याचा हा दृश्य परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे. बाँबे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेन्स निर्देशांक १.२२ टक्के किंवा ९३२ अंशांनी कमी होऊन ७५,३६४ वर स्थिरावला. तर निफ्टी निर्देशांकात ३४६ अंशांची घसरण होऊन तो २२,९०४ अंशांवर बंद झाला. (Tariff War)
निर्देशांकांमधील या घसरणीचा परिणाम असा झाला की, एका दिवसांत गुंतवणूकदारांचं एकूण १० लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. या पडझडीमागची ४ महत्त्वाची कारणं जाणून घेऊया, (Tariff War)
(हेही वाचा – IPL 2025, Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह संघात कधी परतणार, प्रश्नावर हार्दिकचा मोठा अपडेट)
आयात शुल्कवाढीमुळे व्यापारी युद्धाची भीती :
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला नवीन आयात शुल्क वाढ लागू केली. यात चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर सर्वाधिक ३६ टक्के आयात शुल्क लागणार आहे. त्या खालोखाल भारतावर २६ टक्के आयात शुल्क लादण्यात आलं आहे. युरोपीयन देश, युनायटेड किंग्डम व इतर आशियाई देशांवरही याच प्रमाणात शुल्क लावण्यात आलं आहे. अशावेळी हे देशही स्वस्थ बसण्याची शक्यता कमीच आहे. या देशांनीही प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन मालावर नव्याने शुल्क लादलं तर जगभरात व्यापारी युद्धाचा नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. त्यातून महागाईही वाढू शकते. अशा परिस्थितीत बाजारातील अनिश्चितता वाढली आहे आणि त्याचा परिणाम शेअर बाजारावर होताना दिसत आहे. (Tariff War)
जागतिक बाजारातील मंदी :
खुद्द अमेरिकन बाजारांमध्येही सध्या मंदीचं वातावरण आहे. २०२० च्य कोव्हिड दरम्यानच्या मंदीनंतरचा सगळ्यात खराब दिवस अमेरिकन शेअर बाजारांनीही शुक्रवारी पाहिला. वॉल स्ट्रीटवर २.४ ट्रिलियन अमेरिकन डॉलरचा चुराडा झाल्याचं बोललं जात आहे. युरोप तसंच जपानच्या शेअर बाजारांमध्येही वेगळी परिस्थिती नव्हती. अमेरिकन ट्रेझरी बाँड आणि सोन्यातील गुंतणूकही बाजारातील अस्थिरताच अधोरेखित करते. या पार्श्वभूमीवर ही पडझड बघायला मिळत आहे. (Tariff War)
(हेही वाचा – आता हमाल मिळणार ऑनलाइन ; Western Railway ने सुरू केली ‘पोर्टर ऑन कॉल’प्रणाली)
भारतीय फार्मा उद्योगावर आयात शुल्क वाढीची कुऱ्हाड :
ट्रम्प यांनी २ एप्रिलला केलेल्या घोषणेत फार्मा किंवा औषध कंपन्या हेतूपुरस्सर वगळल्या आहेत. पण, त्यांचं एक वाक्य सगळ्यांनाच लक्षात राहिलं आहे. ‘फार्माचा आम्ही वेगळा विचार करू. आणि त्या उत्पादनांवरील आयात शुल्काचा निर्णय येत्या काही दिवसांत घेऊ,’ असं ट्रम्प म्हणाले. या विधानामुळे भारतीय फार्मा कंपन्यांमध्ये घबराट पसरली आहे. कारण, डॉ. रेड्डीज, सन फार्मा, अरविंदो फार्मा यांचा अमेरिका हा सगळ्यात मोठा व्यापारी मित्र आहे. या कंपन्यांची उत्पादनं मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत निर्यात होतात. येत्या दिवसांत त्यांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे मागचे दोन दिवस फार्मा कंपन्यांचे शेअर ५ ते १० टक्क्यांनी घसरले आहेत आणि त्याचा फटका भारतीय बाजारांना बसतो आहे. (Tariff War)
मोठ्या कंपन्यांमध्ये पडझड :
निफ्टीच्या ५० कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेली पडझड हे आणखी एक महत्त्वांच कारण आहे. कारण, त्याचा थेट फटका निर्देशांकाला बसतो. रिलायन्स हा बाजारातील दिग्गज शेअर आहे. पण, त्यातही मोठी पडझड झाली आहे. तर फार्मा, धातू, वाहन उद्योग, माहिती – तंत्रज्ञान या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअरही घसरले आहेत. त्यामुळे हे निर्देशांकही खाली आले आहेत. (Tariff War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community