…तर मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत रुग्ण संख्या ‘कमी’ होईल! काय आहे टास्क फोर्सच्या डॉ. ओक यांचे मत?

माझी निश्चितच धारणा आहे, की ही संख्या ३० एप्रिल किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात खाली येईल, असा विश्वास डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केला.

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी आपल्याला ३० एप्रिलपर्यंत दुसरी संधी मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक जनतेने नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास, ३० एप्रिल किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही संख्या निश्चितच कमी होईल, असा विश्वास केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केला. आपण सर्वांनी जर काटेकोरपणे नियमांचे पालन केले, तर ही संख्या कमी झालेली पाहायला मिळेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

डॉ. ओक यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष

मुंबईमध्ये लागू असलेला लॉकडाऊन जानेवारी महिन्यामध्ये शिथिल करुन, सर्वसामान्य जनतेला रेल्वे लोकल सेवेचा प्रवास काही नियमित वेळेत खुला केला. पण पुढे या नियमित वेळेचं पालन सर्वसामान्य प्रवाशांकडून केलं गेलं नाही आणि मार्चपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढून पुन्हा एकदा अंशत: लॉकडाऊन किंबहुना कडक निर्बंध लागू करण्यात आले. जानेवारीपासूनच मुंबईकर जनतेला ३१ मार्च २०२१ पर्यंत विशेष काळजी घेण्याचं आवाहन, डॉ. संजय ओक यांनी विविध प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीद्वारे केलं होतं. पण डॉ. ओक यांच्या आवाहनाकडे झालेल्या दुर्लक्षाचा परिणाम पुन्हा मुंबईसह राज्यातील जनतेला कडक निर्बधांच्या माध्यमातून भोगावा लागत आहे.

(हेही वाचाः रुग्णाची घरी जावून वैद्यकीय तपासणी, मग मिळणार गरजेनुसार रुग्णखाट!)

डॉ. ओक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा चढता आलेख पहायला मिळत आहे. आज ऑक्सिजन बेड असले, तरी रुग्णांना आयसीयू बेडचीच अधिक गरज भासू लागली आहे. बहुतांशी रुग्ण घरी उपचार घेत असतानाच अचानक त्यांची प्रकृती खालावते आणि शेवटच्या क्षणाला त्यांना रुग्णालयात हलवण्याची धावपळ केली जाते. त्यामुळे घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाला कधी दाखल करावं, जेणेकरुन त्या रुग्णाचा जीव वाचवता येईल, याबाबत डॉ. संजय ओक यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

कधी घेऊ शकता घरी राहून उपचार?

  • ज्यावेळी आपल्याला नवीन कोणतीच लक्षणे(ताप येणं, किंवा धाप लागणं, श्वास घेताना कष्ट घ्यावे लागणं आवाज बदलणं)दिसून येत नाहीत.
  • घरी राहणाऱ्या माणसांनी रोज सकाळी आणि संध्याकाळी सहा मिनिटं चालून, आपली ऑक्सिजनची पातळी तपासायला हवी.
  • ही पातळी जर ९०च्या खाली जायला लागली, तर होम क्वारंटाईन(घरी राहून) उपचार घेणे थांबवून रुग्णालयामध्ये भरती व्हायला हवे.

असे डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

(हेही वाचाः मुंबईत मागील २० दिवसांमध्ये १ हजार २२८ आयसीयू बेड वाढले, तरीही…)

घाबरू नका, जागरुक राहा

मी लोकांना घाबरवणार नाही आणि घाबरुन जायची गरज नाही. पण मी त्यांना सजग मात्र नक्की करेन. मी त्यांना लक्षणाबाबत जागरुक करेन. त्यांना त्यांच्या स्वास्थ्याबाबत जागरुक करेन आणि रुग्णाला योग्य वेळेला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देईन. कारण आपण वेळ निघून गेल्यानंतर माणसाला रुग्णालयात आणतो, ते व्हायला नाही पाहिजे. वेळ निघून जायच्या आतच आपण वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले

व्यक्त केला विश्वास

लॉकडाऊनचा पुढील निर्णय मुख्यमंत्री घेतील. पण आपल्याला ३० एप्रिल पर्यंतची दुसरी संधी मिळालेली आहे. आपण ३० एप्रिलपर्यंत काटेकोरपणे पालन करुया, आता राहता राहिले केवळ ८ दिवस. हे आठ दिवस आपण काटेकोरपणे नियम पाळूया, मग बघूया रुग्ण संख्या किती खाली येते ती. माझी निश्चितच धारणा आहे, की ही संख्या ३० एप्रिल किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात खाली येईल, असा विश्वासही डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केला.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here