बॉम्बेहायकडील ५ मृतदेह रायगड समुद्रकिनारी सापडले?

तौक्ते चक्री वादळामध्ये पी-305 बार्जवरील सुमारे 15 तर वरप्रादा या बार्जवरील 11 खलाशी सहा दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत.

तौक्ते चक्री वादळाने बॉम्बेहाय येथे पी ३०५ तराफा बुडाला, त्यामुळे ६६ जणांचे मृतदेह सापडले, अजूनही काही जण बेपत्ता आहेत. त्यातील ५ मृतदेह हे रायगडच्या समुद्रकिनारी अलिबाग आणि मुरुड येथे सापडल्याचे समजते.

येलो गेट पोलिसांना माहिती दिली!   

तौक्ते वादळाचा बॉम्बेहाय परिसरात तेल विहीरींसाठी काम करणाऱ्या नौका आणि तराफांना बसला होता. खवळलेल्या समुद्रामध्ये कर्मचारी, खलाशी बेपत्ता झाले होते. गेल्या दोन दिवसांत या बेपत्ता झालेल्या खलाशी-कर्मचाऱ्यांपैकी पाच जणांचे मृतदेह अलिबाग व मुरुड किनाऱ्यावर सापडले आहेत. पाच पैकी एक मृतदेह शुक्रवारी, 21 मे रोजी सायंकाळी मुरुड समुद्र किनारी आढळला होता. येलो गेट पोलिस आणि ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांना याबाबत रायगड पोलिसांनी कळविले.

(हेही वाचा : पंकजा मुंडेंना सर्वधर्म समभावाचा साक्षात्कार! सोशल मीडियात ट्रोल!)

मृतदेहाचे डीएनएचे नमुने घेण्यात येणार!  

अलिबाग तालुक्यातील मांडवा परिसरात दोन, अलिबाग समुद्रकिनारी दोन आणि आणि मुरुड समुद्रकिनारी एक असे एकूण आतापर्यंत पाच मृतदेह सापडले आहेत. अचानक समुद्र किनारी मृतदेह दिसून आल्याने स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यातील काही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे, तसेच मृतदेहाचे डीएनएचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्यानंतर मुंबई पोलिस आणि ओएनजीसी अधिकाऱ्यांना हे मृतदेह देण्यात येणार आहेत. तौक्ते चक्री वादळामध्ये पी-305 बार्जवरील सुमारे 15 तर वरप्रादा या बार्जवरील 11 खलाशी सहा दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. रायगडच्या समुद्र किनारी सापडलेले मृतदेह नक्की कोणाचे आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here