दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत, त्या सुरु व्हाव्यात आणि शाळाशाळांमध्ये मुलांचा किलबिलाट सुरु व्हावा, अशी शिक्षकांना अपेक्षा होती, मुलांनाही शाळेची आस लागली होती. अखेर ५ ऑक्टोबरपासून राज्यभर ५ वी ते १०वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले. मात्र या पहिल्याच दिवशी चंद्रपुरात ५वी इयत्तेच्या विद्यार्थिनीला अत्यंत धक्कादायक अनुभव आला. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने पहिल्याच दिवशी अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिला शिकार बनवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
…आणि पालकांनीच मुख्याध्यापकाला कोंडले!
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील तुकुम गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार शाळेच्या पहिल्याच दिवशी घडला आहे. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या नराधम मुख्याध्यापक भाऊराव तुमडे याने जेव्हा शाळा भरली तेव्हा इत्तर विद्यार्थिनींना स्वच्छता मोहिमेसाठी बाहेर पाठवले. त्यानंतर एकट्या राहिलेल्या पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीचा त्या मुख्याध्यापकाने विनयभंग केला. हा घडला प्रकार जेव्हा पीडित विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणींना कळवले. त्यानंतर त्यांनी पालकांना सांगितले. त्यावर संतप्त पालकांनी शाळेत येऊन कारवाई करण्याची मागणी केली. शाळेच्या पहिल्या दिवशीच हा असा घृणास्पद प्रकार घडल्याने संतापाची लाट उसळली आहे. हा प्रकार समोर आल्यावर संतप्त पालकांनी शाळेत येऊन संबंधित नराधम मुख्याध्यापक तुमडे याला खोलीत कोंडून ठेवले. तसेच पोलिसांना बोलावून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी पंचायत समितीचे बल्लारपूरचे गटशिक्षण अधिकारीही घटनास्थळी पोहचले.
(हेही वाचा : एनसीबीचे ‘ऑपरेशन कॉर्डिलीया क्रूझ’… वाचा संपूर्ण कारवाईचा ‘थरार’)
७ विद्यार्थिनींचा केलेला विनयभंग
तुमडे याची अधिक चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. मुख्याध्यापक तुमडे हा याआधीही विद्यार्थिनींचा विनयभंग करायचा, अशा प्रकारे त्याने आता पर्यंत ७ विद्यार्थिनींचा विनयभंग केला आहे, असा प्रकार समोर आला आहे.
Join Our WhatsApp Community