National Teacher Award: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांची निवड

198
National Teacher Award: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांची निवड
National Teacher Award: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांची निवड

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली.यावेळी महाराष्ट्रातील एकमेव शिक्षिकेची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव महाळुंगे (ता.आंबेगाव) येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या या पुरस्कारासाठी हिंदुस्थानातून 50 शिक्षिकांची, तर महाराष्ट्रातून निवड करण्यात आलेल्या शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे या एकमेव शिक्षिका आहेत. यावेळी शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे शिक्षणातील उद्दिष्टांबाबत सांगताना म्हणाल्या की, जेव्हा शिकण्यात आनंद जोडला जातो, तेव्हा शिक्षण खऱ्या अर्थाने दर्जेदार होतं. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेला जास्तीतजास्त विद्यार्थीकेंद्रित आणि आनंददायी बनवण्यावर माझा भर आहे. शिक्षणाचा विद्यार्थ्यांना भविष्यात वापर करता यावा, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे शिक्षण मिळावं, त्यांच्यात 21व्या शतकातील कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी जीवनाभिमुख शिक्षण देण्याचं माझं उद्दिष्ट आहे. ते साधण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा अभिनव वापर करत आहोत. याचंच फलित म्हणजे हा पुरस्कार आहे. यामुळे आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळेल. मला मिळालेला हा पुरस्कार विद्यार्थ्यांना समर्पित करत आहे.

शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांनी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत माहिती-तंत्रज्ञानाचा अभिनव वापर जगभरातील विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल शिक्षणाचे आदान-प्रदान,गेमी फिकेशन इन एज्युकेशन प्रकल्प, AR-VRचा वापर, असे वेगवेगळे तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग केले. ऑनलाईन शिक्षण, इतर देशातील शाळांशी थेट विद्यार्थ्यांचा संवाद, वेबसाईट मोबाईल, अॅप्लिकेशनचा वापर, राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण, कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन अत्याधुनिक शिक्षण दिले आहे.

23 जूनला पुरस्कार निवडीची प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला जिल्हा पातळीवर आणि नंतर राज्य पातळीवर 108 शिक्षकांची निवड झाली. महाराष्ट्र राज्यातून 6 शिक्षकांची नावे केंद्र सरकारकडे पुरस्कारासाठी पाठवण्यात आली. 11 ऑगस्टला पुणे येथून ऑनलाईन मुलाखत झाली. पुरस्कारासाठी निवड करताना शिक्षक म्हणून किती वर्षे काम केले, किती कोर्सेस केले, किती लेख प्रसिद्ध झाले, विद्यार्थ्यांची प्रगती, विविध प्रशिक्षण इतर शिक्षकांना मार्गदर्शन, स्वत:चे प्रोफाईल तयार करणे आणि प्रेंझेटेशन देणे या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होता, असे शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे म्हणाल्या.

कुटुंबियांनी तसेच पिंपळगाव ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याचे शिक्षिका गांजाळे शिंदे नम्रपणे सांगतात. शिक्षण क्षेत्रातील मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे वितरण येत्या 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार आहे. प्रत्येकी 50 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि रौप्य पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मृणाल गांजाळे या गेली 14 वर्षे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांना 2019 मध्ये राष्ट्रीय आय सी टी पुरस्कार मिळाला. 2021 मध्ये सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्कार मिळाला आहे. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विविध उपक्रम हाती घेऊन नवनवीन कल्पना शाळेत राबवत असल्यामुळे त्यांच्या या कामाची दखल भारत सरकारने घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.त्यामुळे शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.