महापालिकेच्या माध्यमिक शाळेत ताशी मानधनावर ज्ञानदानाचे काम करता शिक्षक

मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे यासाठी लागणाऱ्या शिक्षकांची पदे मात्र रिक्त आहेत. त्यामुळे ही रिक्तपदे वेळेत भरणे शक्य नसल्याने प्रशासनाने प्रतितास दीडशे रुपयांच्या मानधानावर शिक्षकांची नियुक्ती केली. परंतु आता वर्ष उलटत आले तरी या शिक्षकांची रिक्त जागांवर भरती करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही भरती न केल्यास पुढील शैक्षणिक वर्षांतही महापालिकेला ताशी मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : पुणेकरांची गैरसोय! PMPML बसगाड्या पुरवणाऱ्या कंत्राटदारांचा संप )

मुंबई महापालिका शिक्षण विभागामार्फत एकूण २४३ महापालिकेच्या माध्यमिक शाळा असून शैक्षणिक वर्ष २०२२ पासून एकच लक्ष्य एक लक्ष मुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढलेले आहेत. परंतु त्या प्रमाणात शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे तातडीने भरणे आवश्यक असली तरी या नियमित भरती प्रक्रियेस साधारण ६ ते ७ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार शिक्षकांच्या या भरती प्रक्रिया पूर्ण होण्यास लागणाऱ्या विलंबामुळे शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ नये याकरता रिक्त शिक्षकांची पदे भरणे आवश्यक होते. परंतु महापालिका आयुक्तांच्या मंजूरीने मुख्याध्यापकांच्या अधिकाराचे विक्रेंद्रीकरण करण्याबाबत १९ ऑक्टोबर २०१९ रोजी आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आवश्यकतेनुसार मुख्याध्यापकांमार्फत तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक भरती करता येईल. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात दिर्घ मुदत रजेवर असणाऱ्या शिक्षकांच्या जागी किंवा रिक्त जागी आवश्यक असलेले शिक्षक तातडीने भरण्याचा निर्णय घेत त्यांना मानधन प्रतितास दीडशे प्रमाणे वेतन देय करण्यास मंजूरी दिलेली आहे.

त्यानुसार माध्यमिक शाळांमधील १५० शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी प्रति तास दीडशे रुपयांच्या मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये शिक्षकांना केवळ सहा तासच सेवा बजावता येणार प्रति तास १५० रुपये याप्रमाणे महिन्याला २२ हजार ५०० मानधनावर या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षांसाठी ही नियुक्ती केली असली तरी आगामी शैक्षणिक वर्षांसाठी या रिक्त जागांसाठी शिक्षकांची कायमस्वरुपी नियुक्ती करणे आवश्यक असल्याने यासाठीची भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे.परंतु अद्यापही या रिक्त पदांसाठी कोणत्याही प्रकारच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जर रिक्त जागी नवीन शिक्षकांची भरती न केल्यास या ताशी मानधनावरील शिक्षकांची सेवा पुढे कायम ठेवली जाईल. परंतु एवढ्या कमी मानधनामध्ये शिक्षकांकडून चांगल्या दर्जाच्या शिक्षणाची अपेक्षा काय करणार असा प्रश्न उपस्थित आहे. त्यामुळे शिक्षकांची भरती केल्यास प्रत्येक शिक्षकांवर शिक्षणाची जबाबदारी सोपवून त्यांना त्यासाठी जबाबदार धरले जावू शकते,असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here