वाढीव पदांना मान्यता द्यावी आणि वेतन देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पद शिक्षक कृती समितीतर्फे बुधवारी आंदोलन करण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी ऐन दिवाळीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या शिक्षकांचे गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाची कुणीही दखल न घेतल्याने शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण शिक्षक वर्ग थेट शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन करताना दिसले.
‘अन्यथा आत्मदहन करू’
सकाळी १०.३० वाजेपासून राज्यभरातील ८० शिक्षकांचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या शासकीय निवास्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. दिवाळीचा सण असूनही, सरकार दुर्लक्ष करीत आहे. शिक्षकांची दिवाळी अंधारात असल्याचा आरोप ठिय्या आंदोलनातील शिक्षकांनी केला आहे. दरम्यान, मागण्या पूर्ण करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.
(हेही वाचा-आता दुसरा डोस मिळणार घरबसल्या! कसा ते वाचा?)
हालअपेष्ठा थांबवाव्यात शिक्षकांची मागणी
कृती समितीचे अध्यक्ष सतिन चव्हाण यांनी असे सांगितले की, गेली १० ते १५ वर्षे आम्ही विनावेतन काम करत आहोत. आमची मागणी पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी निवेदने करुन न्याय मागितला. पण आमची मागणी मान्य झाली नाही. तसेच २००३-०४ ते २०१८-१९ पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव प्रस्तावित पदांची संपूर्ण माहिती संचालक स्तरावरुन मंत्रालय स्तरावर पोहोचविण्यात आली आहे. आज आंदोलनाचा ६२ वा दिवस असून आमच्या वाढीव पदांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून आमच्या सुरु असलेल्या हालअपेष्ठा थांबवाव्यात अशी मागणी देखील कृती समितीतर्फे करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community