देशातील पूर्व आणि मध्य भागांत उष्णतेची लाट दिवसेंदिवस तीव्र होत असताना विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील कमाल पाऱ्याने देशात तिसऱ्यांदा सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद केली आहे. चंद्रपूरात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानंतर जगभरातील उष्ण देशांच्या यादीत चंद्रपूर सहाव्या तर अकोला जिल्हा ४३.१ अंश कमाल तापमान नोंदीमुळे तेरावे स्थानी आहे. दोन्ही शहरांनी या यादीत हॅटट्रीक केली असतानाच वर्ध्यातील कमाल तापमानाची नोंद जगाच्या उष्ण शहरांच्या यादीत बाराव्या स्थानावर पोहोचली. वर्धा येथे कमाल तापमान ४३.२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्र झाला निर्बंधमुक्त; आता मास्क वापरणे ऐच्छिक, गुढीपाडवा शोभायात्रांना परवानगी )
पहिल्या पंधरा उष्ण शहरांतील यादीमध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील तीन शहरांचा समावेश झाला आहे. या तिन्ही शहरांतील कमाल तापमानाची नोंद केंद्रीय हवामान खात्याच्या स्थानकातून घेतली आहे. मात्र हवामान खात्याच्या स्वयंचलित केंद्रातून (ऑटोमेटिक व्हेदर स्टेशन) भिरा येथील कमाल तापमानाची नोंद गुरूवारी ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांप्रमाणे भिरा येथील कमाल तापमानही जागतिक पातळीवरील नोंदीत पोहोचले. ही नोंद अधिकृत नसली तरीही यादीनुसार भिरा येथील कमाल तापमानाला १४वे स्थान मिळाले आहे.
चाळीस अंशापुढे नोंदवले गेलेले इतर जिल्हे
- ब्रह्मपुरी – ४२.४ अंश सेल्सिअस
- नागपूर,यवतमाळ, अमरावती – ४२ अंश सेल्सिअस
- महाड – ४१.९ अंश सेल्सिअस
- गोंदिया – ४१.८ अंश सेल्सिअस
- वाशिम – ४१.५ अंश सेल्सिअस
- चिपळूण – ४१.३ अंश सेल्सिअस
- आरवली – ४१.२ अंश सेल्सिअस
- मालेगाव – ४१.१ अंश सेल्सिअस