देशात अवकाळी पावसानंतर आता राज्यातील तापमानात वाढ होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम भारत आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये पुढील ७२ तास कमाल तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
( हेही वाचा : मुंबई ते ठाणे आता सिग्नलमुक्त सुसाट प्रवास!)
उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने हवामान विभागाकडून नागरिकांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४० अंशावर गेले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १५ एप्रिल ते जून या कालावधीत मध्य, पूर्व आणि उत्तर – पश्चिम भारतातील बहुतांश भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि तेलंगणामध्ये कमाल तापमान ४० ते ४२ अंशावर गेल्याने तापमान ४५ अंशाच्या वर जाईल अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमान
राज्यात चंद्रपुरात उच्चांकी तापमान नोंदवण्यात आले आहे. ४३.२ डिग्री सेल्सिअस हे या मोसमातील सर्वाधिक तापमान आहे. तर भंडारा आणि नागपूरमध्ये अनुक्रमे ४२ व ४१ अंश तापमान नोंदवले गेले.
- चंद्रपूर – ४३.२
- भंडारा – ४२
- नागपूर – ४१.०
- अकोला – ४०.३
- अमरावती – ४१.४
- गोंदिया – ४०.४
- वर्धा – ४२.२
- यवतमाळ – ४०.५
- वाशिम – ३९.८