शिवाजी मंडईच्या जागी तात्पुरती शेड : कोळणींना वर्षभराची करावी लागणार प्रतीक्षा

मंडईची इमारत धोकादायक झाल्यानंतर २०१८मध्ये तोडून झाल्यानंतरही येथील तळ मजल्यावरील घाऊक मासळी बाजार सुरुच होता.

मुंबईतील घाऊक मासळी बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईचा धोकादायक तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम आता जमीनदोस्त केले जाणार आहे. मात्र, येथील परवानाधारक मासळी विक्रेत्यांसाठी कायमस्वरुपी महात्मा ज्योतीबा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केटच्या टप्पा दोनमधील विकासकामांमध्ये व्यवस्था केली जाणार आहे. हे काम सुरु असल्याने तात्पुरत्या स्वरुपात शिवाजी महाराज मंडईच्याच जागेवर शेड उभारली जाणार असून यावर पावणे तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही शेड एक वर्षात बांधली जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत कोळी भगिनींना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागणार आहे.

२०१८मध्ये बांधकाम तोडूनही तळ मजल्यावरील मासळी बाजार सुरुच होता!

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक झाल्यानंतर या चार मजली इमारतीच्या तोडकामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार तळ अधिक पहिला मजला वगळता उर्वरीत मजल्यांचे बांधकाम पाडण्यात आले होते. हे बांधकाम २०१८मध्ये तोडून झाल्यानंतरही येथील तळ मजल्यावरील घाऊक मासळी बाजार सुरुच होता. परंतु ही वास्तू अतिधोकादायक असल्याकारणाने मुंबई उच्च न्यायालयातील एका याचिकेवर न्यायालयाने मच्छिमारांना तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करावे आणि इमारत सुरक्षित असून जीवितहानी होणार नाही याचे प्रतिज्ञापत्र नमुद करण्यास सांगितले. त्यामुळे मंडई इमारतीमध्ये काही दुर्घटना झाल्यास संबंधित अधिकारी, महापौर व स्थानिक नगरसेवक हे नागरी व फौजदारी उत्तरदायित्वाकरता जबाबदार राहतील, असे आदेशामध्ये न्यायालयाने नमुद केले आहे. त्यामुळे या मंडईचा उर्वरीत भागही पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

सध्या या मंडईत होलसेल, किरकोळसह अन्य असे ५००हून अधिक परवानाधारक असून अतिधोकादायक बांधकाम तोडून दीड महिन्यांमध्ये शेड बांधून देण्याचे आश्वासन बाजार विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला दिले आहे. परंतु सध्या महिला कुलाब्याला जागा विकत घेवून व्यवसाय करत आहेत. तिथेही त्यांना पोलिसांचा त्रास होत आहे. त्यामुळे कोळी महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून जर दीड महिन्यांमध्ये शेड उपलब्ध करून न दिल्यास त्याच जागी आम्ही पुन्हा व्यवसाय करू. आम्ही पर्यायी व्यवसाय करण्यासाठी कसाऱ्याला आणि कुलाब्यातील दोन जागा सूचवल्या होत्या. पण त्याचाही विचार प्रशासन करत नाही.
– नयना पाटील, महाराष्ट्र अध्यक्ष, अखिल भारतीय कोळी महासंघ

(हेही वाचा : घाटकोपरमध्ये समाजकल्याण केंद्राच्या जागेत विकासकासाठी ‘वाट’ मोकळी)

सुमारे पावणे तीन कोटी रुपये खर्च येणार आहे!

त्यानुसार मंडईचे उर्वरीत बांधकाम तोडून त्याच जागेवर मासळी व्यावसायिकांना तात्पुरती शेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेने मागवलेल्या निविदेत कंत्राटदाराची निवड केली असून यासाठी सुमारे पावणे तीन कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती बाजार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. या शेडचे बांधकाम करताना त्यामध्ये परवानाधारक तसेच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हे काम पावसाळ्यासहित एक वर्षात पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे मासळी व्यावसायिकांना एक वर्षात आपला व्यवसाय बंद ठेवावा लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here