बृहन्मुंबई क्रिडा व ललित कला प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांना दहा हजारच पगार

89

मुंबई महापालिकेच्या बृहन्मुंबई क्रिडा व ललित कला प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांना मागील एक वर्षांपासून केवळ दहा हजार एवढाच पगार दिला जात असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. कर्मचाऱ्यांना एका बाजुला कुटुंबाचा चरितार्थ चालवणे कठिण जात असताना दुसरीकडे प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाचे याकडे लक्षच नाही. विश्वस्त मंडळाच्या निष्काळजीपणामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे हे विश्वस्त मंडळ त्वरित बरखास्त करण्यात यावे आणि प्रतिष्ठानच्या १५० कामगार, कर्मचारी वर्गाला महापालिका सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची भाजपची मागणी

मुलुंडमधील महापालिकेचे कालिदास नाट्यगृह आणि प्रियदर्शनी जलतरण तलाव तसेच अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुल आदी बृहन्मुंबई क्रिडा व ललित कला प्रतिष्ठान अंतर्गत येत असून यामध्ये सुमारे १५० कामगार, कर्मचारी कार्यरत आहे. परंतु कोविड काळापासून या सर्व कर्मचाऱ्यांना केवळ सरसकट दहा हजार रुपये पगार दिला जात आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना ४० ते ५० हजार रुपये पगार असताना त्यांना दहा हजार रुपये दिले जात आहे. त्यामुळे दहा हजार रुपयांमध्ये त्यांनी आपले कुटुंब कसे चालवायचे, असा सवाल प्रकाश गंगाधरे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांना केला आहे. काही दिवसांपासून कालिदास नाट्यगृह सुरू झाले आहे. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीकोनातून त्यांचा पगार या पुढे न कापता तो त्यांच्या एकूण पगाराच्या रकमेत उपलब्ध करून द्यावा तसेच विश्वस्त मंडळ त्वरित बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

(हेही वाचा : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेचा झटका : विशेष समित्यांवरील सदस्य संख्या घटवली!)

मुदत ठेवी खर्च केल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा धोक्यात!   

प्रतिष्ठानचे बहुतांशी कर्मचारी हे सेवानिवृत्त झाले आहेत, तर काही सोडून जात आहेत. परंतु प्रतिष्ठानने या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काहींना आपली भविष्य निर्वाह निधीची रक्कमही काढता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याने भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली जावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. प्रतिष्ठानच्यावतीने एकूण १८ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या, त्या ठेवी ६ कोटींवर आल्याची माहिती मुंबई लेबर युनियनच्या निदर्शनास आणून दिल्याचा संदर्भ देत गंगाधरे यांनी हा प्रकार धक्कादायक असून या प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. अशाप्रकारे मुदत ठेवी खर्च केल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा धोक्यात आली आहे. या प्रतिष्ठानचा भाडेकरार २०२० ला संपुष्टात आला होता. त्यानंतर याचा भाडेकरार पुढील १५ वर्षांकरता वाढवून देण्यात आला आहे. परंतु या प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाचे याकडे लक्षच नसून ही दुर्दैवी बाब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.