पश्चिम उपनगरातील पावसाळी आणि वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांची डागडुजी आणि पुनर्बांधणी आधी कामांसाठी मागवलेल्या निविदेत भाग घेतलेल्या कंत्राटदारांनी संगनमत केल्याची शंका आल्याने या निविदेत पात्र ठरलेल्या पाच कंत्राटदारांसह या निविदेत सहभागी झालेल्या तथा बाद झालेल्या सहा कंत्राटदारांना महापालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेतील प्रस्तापित मोठ्या कंपन्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या निविदेतील संगनमताची शक्यता लक्षात घेता महापालिकेने पश्चिम उपनगरातील पर्जन्य जगवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी काढलेले निविदा रद्द करून फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निविदेत सहभागी झालेल्या या सर्व कंत्राटदारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा : MPSC चे विद्यार्थी लेखी आदेश निघेपर्यंत आंदोलनावर ठाम! शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्र्याची भेट)
मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असून अशा पुर परिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या भागांमधील पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी महापालिकेच्यावतीने विद्यमान पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या अर्थात पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच त्यांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेत यासाठी निविदा मागवल्या होत्या. यामध्ये शहर भागांमध्ये दोन कामे, पूर्व उपनगरांमध्ये ११ कामे आणि पश्चिम उपनगरांमध्ये ५ कामे अशाप्रकारे एकूण १८ कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातील पश्चिम उपनगरांमधील ५ कामांसाठी अंदाजित ८० कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या होत्या. या निविदांमधील पाच कामांमध्ये भाग घेतलेल्या कंत्राटदारांपैंकी काही कंत्राटदार हे प्रत्येकी एकेका कामांमध्ये कागदपत्रांची पूर्तता न केल्याने अप्रतिसादात्मक ठरले.
त्यामुळे या निविदेमध्ये संगनमत झाल्याची शंका लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी या संपूर्ण निविदेत सहभागी झालेल्या कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश पर्जन्य जलवाहिनी विभागाला दिले. त्यानुसार पर्जन्य जलवाहिनी विभागाने पश्चिम उपनगरासाठी मागवलेल्या निविदेमध्ये बाद ठरलेल्या आणि सहभागी झालेल्या सहा कंत्राटदारांसह कमी बोली लावून पात्र ठरलेल्या पाच कंत्राटदारांना अशाप्रकारे ११ कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे.
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अशाप्रकारचा प्रकार यापूर्वी अनेक निविदांमध्ये झाला आहे. परंतु याठिकाणी शंका आल्याने कंत्राटदारांनी खरोखरच संगनमत केले आहे का याची खातरजमा करण्यासाठी या कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत.
यामध्ये कंत्राटदार आपले म्हणणे मांडतील आणि ते जर म्हणणे पटले नाहीतर कंत्राटदारांवरील कारवाईच्या संहितेमध्ये ज्या काही शिक्षा आहे, त्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल,असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकरणात कुठल्याही प्रकारची संशयास जागा शिल्लक राहू नये म्हणून पश्चिम उपनगरांसाठी मागवलेल्या निविदा तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. या निविदा रद्द करून फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यानुसार फेरनिविदा मागवण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. दरम्यान, या निविदेत भाग घेतलेल्या आणि पात्र ठरलेल्या सर्व कंत्राटदारांची निविदेसोबत भरलेली अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.